भक्ती परब

शीर्षक नोंदणीसाठी निर्मात्यांची ‘इम्पा’कडे धडपड

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानात घुसून भारताने केलेली कारवाई या घटनांवर आधारित चित्रपट काढण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू असून ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘पुलवामा हायवे नंबर १’, ‘विक्रम वेढा’, ‘बियाँड बॉर्डर’ ही शीर्षके आहेत चित्रपटांची. त्यांची नोंदणी चित्रपट निर्मात्यांनी ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर्स असोसिएशन’कडे (इम्पा) केली आहे. यावरून पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानात घुसून भारताने केलेली कारवाई या घटनांवर आधारित चित्रपट काढण्यासाठी निर्मात्यांमध्ये किती चढाओढ सुरू आहे, ते लक्षात येते.

उरी – दि सर्जिकल स्ट्राईक, दि गाझी अटॅक, राजी, परमाणु – दि स्टोरी ऑफ पोखरण, सत्यमेव जयते, मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी असे देशभक्तीपट व चरित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगले चालले. उरी हल्ल्यानंतर लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बेतलेला सिनेमा तर पाच आठवडे उलटल्यानंतरही चालतो आहे. उरीचे हे यश ताजे असल्याने पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या वायु दलाच्या कारवाईवर चित्रपट काढण्याचे वेध निर्मात्यांना लागले आहेत.

एखाद्या चर्चेत असलेल्या विषयाशी संबंधित चित्रपट काढले की ते चांगलेच चालतात. मग त्या शेतक ऱ्यांच्या आत्महत्त्या असो वा सर्जिकल स्ट्राईक. त्या आधी शीना-बोरा हत्याकांडानंतर निर्मात्यांनी या घटनेशी संबंधित चित्रपट काढण्याची दूरदृष्टी ठेवत शीर्षक नोंदणी आपल्या ‘नावे’ केली होती. भविष्यात कुणी या नावाने चित्रपट काढू नये, हा या मागील उद्देश असतो. आता नोंदणीकरिता आलेल्या नावांच्या यादीवर नजर टाकली तरी पुलवामा हल्ल्याचा परिणाम दिसून येतो. ‘यो जवान, यो किसान’, ‘गोरखा बटालियन’, ‘गोरखा रेजिंमेंट’, ‘गुरखा टायगर’, ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘पुलवामा हायवे नं १’, ‘वरना एक फर्ज’, ‘१७.१७ एचआरएस’, ‘विक्रम वेढा’ या शिर्षकांच्या नोंदणीचे प्रयत्न निर्मात्यांनी सुरू केले आहेत.

पुलवामात १४ फेब्रुवारीला दहशतद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर आपल्या वायु दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानच्या लढावू विमानांची भारतीय हवाई हद्दीत घुसण्याची आगळीक आपल्या वायु दलाने हाणून पाडली. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत सापडले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली. या घटना एकापाठोपाठ एक घडत गेल्या आणि त्याचे तीव्र पडसाद जनसामान्यात उमटले. या घटनांची दखल भारतीय चित्रपटसृष्टीने घेतली नसती तर नवलच. या घटनांकडे निर्मात्यांचे लक्ष वेधले जाणे साहजिक आहे.

यापूर्वीही देशात जेव्हा नाटय़पूर्ण घडामोडी घडल्या तेव्हाही त्यांच्यावर चित्रपट काढण्यासाठी शीर्षक नोंदणीचे प्रयत्न निर्मात्यांनी केले होते, असे इम्पाचे सचिव अनिल नागरथ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शीर्षक नोंदणी का?

चित्रपटांच्या नावांवरून अनेकदा निर्मात्यांमध्ये वाद उद्भवतात. म्हणून सेन्सॉर बोर्डाकडे जाण्यापूर्वी इम्पाकडे निर्मात्यांना नावनोंदणी करावी लागते. ही नोंदणी प्रक्रिया एक ते दोन महिन्यांत पूर्ण होते. तीन वर्षांच्या आत या नावाने चित्रपट बनवून तो निर्मात्यांना प्रदर्शित करावा लागतो.

Story img Loader