मुंबई : अभिनेता सैफअली खान याच्यावरील हल्ल्याने गेल्यावर्षी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचे प्रकरण पुन्हा स्मृतीपटलावर आणले. चित्रपटसृष्टीतील कलाकार, अभिनेते हे खंडणीखोरांच्या निशाण्यावर असल्याचे दिसते आहे. यापूर्वी अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे.
सलमान खान
वांद्रे परिसरातील अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल,२०२४ ला करण्यात आलेल्या गोळीबार प्रकणात लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईविरोधात गुन्हा दाखल आहे. अनमोल बिश्नोईने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारा केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.याशिवाय अनमोल माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपींच्या संपर्कात होता.
हेही वाचा >>> सैफ अली खानवर यशस्वी शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागात उपचार सुरू, प्रकृतीत सुधारणा
सुनील पाल
डिसेंबर २०२४ मध्ये, अभिनेता- हास्य कलाकार सुनील पाल यांचेही अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली आणि८ लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांना मेरठमधील रस्त्यावर सोडून दिले. अपहरणकर्त्यांच्या टोळीतील नऊ सदस्यांनाही अटक करण्यात आले आहे.
मुश्ताक खान
नोव्हेंबर २०२४ अभिनेता मुश्ताक खान यांचे कथितपणे अपहरण झाले, त्यांना मेरठमध्ये एका कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांना बिजनोरमधील चहशेरी भागात ठेवले आणि त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवरून २ लाख रुपये हस्तांतरित केले. एक दिवसानंतर खान सुटून मुंबईत परतले.
शाहरुख खान
सुपरस्टार शाहरुख खान यांना मुंबई अंडरवर्ल्डकडून अनेक वेळा धमक्या आल्या आहेत आणि कुख्यात अबु सालेमकडूनही त्याला धमकावण्यात आले होते. सध्या शाहरुखला वायप्लस सुरक्षा आहे.
हेही वाचा >>> Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खानच्या घरात घुसलेला आरोपी हा…”, डीसीपी गेडाम यांनी दिली महत्त्वाची माहिती
प्रीती झिंटा
अभिनेत्री प्रीती झिंटा यांनाही चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटावेळी खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्यांनी प्रीतीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती.
निर्माता दिनेश आनंद व अजित दिवानी
१४ फेब्रुवारी २००१ ला निर्माता दिनेश आनंद व ३० जून २००१ ला अभिनेती मनिषा कोयरालाचा माजी सचिव व निर्माता अजित दिवाणी यांची छोटा अबु सालेमने हत्या घडवून आणली होती. छोटा शकीलसोबत वादातनंतर सालेमने या दोघांच्या हत्या केल्याचे बोलले जाते.
राकेश रोशन
२००० मध्ये कहो “कहो ना… प्यार है” या चित्रपटानंतर निर्माता व दिग्दर्शक राकेश रोशन यांना खंडणीसाठी अबु सालेमकडून धमक्या आल्या होत्यात त्यानंतर २१ जानेवारी २००० मध्ये दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली, आणि छातीला गोळी चाटून गेली. जखमी असतानाही राकेश रोशन स्वतः गाडी चालवून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि नंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निर्माता जावेद रियाज सिद्धीकी
निर्माता जावेद रियाज सिद्दीकी यांची १९९४ मध्ये अंधेरी यारी रोड येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हिंदी चित्रपट सृष्टीतील ही पहिली हत्या मानली जाते. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टी हादरली होती.
निर्माता मुकेश दुग्गल
निर्माता सिद्धीकी यांच्याप्रमाणे दुग्गल यांचीही अबु सालेमने अंधेरी येथे हत्या घटवून आणली होती. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तीन वर्षांनी ८ मार्च १९९७ मध्ये ही हत्या झाली होती.
गुलशन कुमार
टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या १९९७ मध्ये हत्या करण्यात आली होती. गुजशनकुमार कुमार मुंबईतील अंधेरीतील शिवमंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ प्रार्थनेसाठी जायचे. त्यावेळी १२ ऑगस्ट १९९७ ला त्यांना हेरून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर कूपर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांना दोनवेळी त्यांना धमकीचे दूरध्वनी आले होते.
निर्माता राजीव राय
निर्माता राजीव राय यांच्यावर हल्ला व अपहरणाचा प्रयत्न १९९७ मध्ये झाला होता. अबु सालेमने यापूर्वी त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. पोलीस सुरक्षा रक्षकामुळे हा प्रयत्न फसला.