अमिताभ बच्चन, शाहरूख खान, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण.. त्याचबरोबर मराठी चित्रपट किंवा मालिकांमधील कलावंत पाहण्याची, संधी आता मिळणार आहे. ‘बॉलीवूड टुरिझम’चा अभिनव उपक्रम गोरेगावच्या  ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ येथे २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. अगदी केवळ ४९९ रुपयांपासून ३२५० रुपयांपर्यंत एक ते तीन दिवसांच्या सहलीच्या पॅकेजचा आनंद अनुभवण्यास मिळणार आहे.
बॉलीवूडशी सर्वसामान्यांचा सहज संपर्क होत नाही. त्यांना या दुनियेचे आकर्षण मात्र जबरदस्त असते. हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. त्या धर्तीवर मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरू असलेले चित्रीकरण सर्वाना पाहता यावे आणि चित्रपट, सिनेसृष्टीबाबत अधिकाधिक माहिती, तंत्रज्ञान व इतिहास ‘बॉलीवूड टुरिझम’ या संकल्पनेतून सर्वांपर्यंत पोचवावा, या उद्दिष्टातून हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. त्यातून शेकडो कोटी रुपयांचा महसूलही मिळणार असून ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ आणि ‘महाराष्ट्र पर्यटन महामंडळ’ संयुक्तपणे हा उपक्रम सुरू करणार आहे. फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख आणि पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी या उपक्रमाविषयी पत्रकारांना माहिती दिली. चित्रीकरण कधी सुरू आहे, त्यामध्ये मोकळा वेळ किती आहे, त्या काळात संबंधित दिग्दर्शक व अन्य संबंधितांशी संपर्क साधून गटागटाने सेटची पाहणी व अभिनेत्यांशी संवादाची संधीही उपलब्ध होणार आहे.