मुंबई : सीमा हैदर आणि २५ जण पाकिस्तानातून आले असून दोन-तीन तासांत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला होता. याप्रकरणी तपासात दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण वनराई परिसरातून बोलत असून सीमा हैदर व २५ व्यक्ती पाकिस्तानातून आल्या आहेत. सांभाळून रहा. तुमच्या बाजूला दोन-तीन तासांत बॉम्बस्फोट होईल, तेव्हा तुम्हाला समजेल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे याबाबत गुन्हे शाखा व वनराई पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे तपास करून एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – VIDEO: गोष्ट मुंबईची : भाग १३० | मुंबईतील या नद्याही नागमोडीच का वाहतात?
हेही वाचा – म्हाडा भूखंड भाडेपट्टा महाग, पुनर्विकासात पुन्हा अडचण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारा ईमेल केंद्रीय यंत्रणांना नुकताच मिळाला होता. मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांत ८० हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलता आले नाही तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केल्यानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवरील ताण वाढतो आहे.