लालफितीचा फटका
मुंबईकरांचे जीवन सुरक्षित रहावे यासाठी अहोरात्र झटणाऱ्या मुंबई पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वानांचा सध्या हक्काच्या निवाऱ्याचा शोध सुरू आहे. या पथकातील श्वानांसाठी असलेल्या जागेचा पुनर्विकास रखडल्याने एकूण ११ श्वानांना एका जुनाट बंगल्यात दाटीवाटीने राहावे लागत आहे.
बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सर्वाधिक काम दक्षिण मुंबईत असल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील पीकेट मार्ग येथे या श्वानांना जागा देण्यात आली होती. मात्र, इमारत जुनाट झाल्याने तिच्या पुनर्बाधणीचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला. त्यामुळे श्वानपथकाला काळाचौकी पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या एका जुन्या बंगल्यात जाण्यास सांगितले. येथे एक-दीड हजार चौरस फुटांच्या जागेत सध्या ११ श्वानांना ठेवण्यात आले आहे. लॅब्रेडोर जातीच्या श्वानांना चांगल्या वातावरणात ठेवले तर त्यांची कार्यक्षमता वाढते आणि आयुष्यही चांगल्या प्रतीचे राहते. मात्र, सरकारच्या वेळखाऊ धोरणामुळे या श्वानांना वाईट परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत. श्वानांचे मदतनीस (हँडलर) या ११ श्वानांची पदरमोड करून त्यांना चांगल्या परिस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत असून श्वानांसाठी निवासाची अतिरिक्त जागा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
पथक दक्षिण मुंबईत का?
* दक्षिण मुंबई हा परिसर अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार, पोलीस मुख्यालय यांसारख्या ठिकाणांची दर दिवशी श्वान पथकाकडून तपासणी करण्यात येते.
* संशयित वस्तू सापडण्याच्या सर्वाधिक घटना या दक्षिण मुंबईतच घडत असल्याने श्वान पथक याच परिसरात असणे गरजेचे असते; परंतु काळाचौकीत पथकाचे स्थलांतर करण्यात आल्याने त्यांच्या वाहतुकीत महत्त्वाचा वेळ खर्च होतो.
* श्वानांना आराम मिळावा, उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी असलेल्या पोलिसांच्या गाडय़ांमध्ये वातानुकूलनाची कुठलीही सोय नसल्याने अवघ्या १५ ते २० मिनिटांत श्वान थकतात.