मुंबई : गेल्या दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याचा धमक्या मिळाल्या आहेत. त्यात पाच आंतरराष्ट्रीय व आठ देशांतर्गत विमानांचा समावेश आहे. मुंबई विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला (सीआयएसएफ) निनावी ईमेल व एक्स(ट्वीटर) पोस्टद्वारे या धमक्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय शनिवारी उदयपूर-मुंबई विमानामध्ये “विमानात बॉम्ब” असल्याचा संदेश विमानात एका टिश्यू पेपरवर लिहून ठेवला होता. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरूवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआरएसएफ अधिकाऱ्यांना विमानतळ पोलीस ठाण्याला सहा विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी ईमेल आणि एक्स पोस्टद्वारे मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर इंडिगो एअरलाइन्सचे जेद्दा ते मुंबई आणि विस्तारा एअरलाइन्सचे सिंगापूर ते मुंबई विमान टर्मिनल २ वर नेण्यात आले. तसेच विस्तारा एअरलाइन्सचे उदयपूर ते मुंबई आणि इंडिगो एअरलाइन्सचे जेद्दा ते मुंबई विमान सहार विमानतळावर नेण्यात आले. तसेच स्पाईसजेट एअरलाइन्सचे दरभंगा ते मुंबई विमान उतरल्यानंतर त्याला आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले. त्याचप्रमाणे, अलायन्स एअरलाइन्सचे सिंधुदुर्ग ते मुंबई विमान टर्मिनल १ वर नेण्यात आले. सर्व विमानांमधील प्रवाशांची आणि सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. आवश्यक तपासणीनंतर, धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वाचा…परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे गृहनिर्माण धोरण हवे! मुंबई ग्राहक पंचायतीच्या परिषदेत सूर

रविवारी देशातील विविध एअरलाइन्सवर बॉम्बची माहिती मिळाली. त्यात यूके १०६ (सिंगापूर ते मुंबई) आणि यूके १०७ (मुंबई ते सिंगापूर) यासह विस्तारा एअरलाइन्सला त्यांच्या सहा फ्लाइटसाठी धमक्या मिळाल्या. अकासा एअर ला देखील क्यूपी १०२ (अहमदाबाद ते मुंबई), क्यूपी १३८५ (मुंबई ते बागडोगरा), क्यूपी १५१९ (कोची ते मुंबई) आणि क्यूपी १५२६ (लखनौ ते मुंबई) यासह अनेक विमानांबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. इंडिगो एअरलाइन्सने ६ ई ५८ (जेद्दा ते मुंबई) आणि ६ ई १७ (मुंबई ते इस्तंबूल) सह सहा विमानांवर सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्लायात आला होता. प्रत्येक विमानांची व प्रवश्यांची सुरक्षेच्या दृष्टीन्े तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले. सहार पोलिसांनी गेल्या आठवड्यात छत्तीसगडमधून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला पकडले होते. त्याच्यावर एक्स या समाज माध्यमावर एका व्यक्तीच्या नावाने खाते तयार करून धमकीचा संदेश पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीसोबतच्या जून्या वादावरून त्याने अडवकण्यासाठी हा प्रकार केला होता.

हे ही वाचा…मुंबईत अदानीसाठी जागा, मग गिरणी कामगारांसाठी का नाही, संतप्त गिरणी कामगारांचा प्रश्न, मुंबईतच पुनर्वसनाची मागणी

टिश्यूपेपरवर धमकी

विस्तारा एअरलाइन्सच्या प्रतिनिधी स्वाती माकन यांच्या तक्रारीवरून, मुंबईतील सहार पोलिसांनी एका अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम १२५, ३५१(४)),३५३(१)(ब)) आणि विमान कायदा कलम २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार एका व्यक्तीने उदयपूर ते मुंबई विमानामध्ये बॉम्ब आहे, १ वाजून ४८ मिनिटांनी त्याचा स्फोट होणार असल्याचे टिश्यूपेपरवर लिहिले होते. ते विमान महाराणा प्रताप विमानतळ उदयपूर येथून शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास निघाले होते. धमकीची माहिती मिळाल्यानंतर, ते विमान सहार विमानतळावर उतरले आणि विमानाची पूर्ण तपासणी केल्यानंतर कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तो टिश्यू पेपर कोणी ठेवला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb threats received in 13 flights in mumbai in last two days mumbai print news sud 02