सोनिया खुराणा आता दिल्लीत राहात असली, तरी ‘बालपण सहारणपूरमध्येच गेलं’ हा उल्लेख तिच्या बोलण्यात नेहमी येतो. आज ती विश्वनागरिक आहे, याचं भानही तिला असतंच. ‘व्हिडीओ आर्ट’ या प्रकारातील कलावंत, अशी तिची ओळख असली, तरी तिचे बहुतेक व्हिडीओ हे तिच्याच क्षणवास्तविक कला-सादरीकरणांवर किंवा ‘परफॉर्मन्स आर्ट’वर आधारित आहेत. हे सर्व परफॉर्मन्स-व्हिडीओ किंवा व्हिडीओ-परफॉर्मन्स (दोन्हीत फरक आहे! कसा ते पुढे पाहूच) सोनियानं स्वत:वर केलेले अनेक प्रयोग दाखवतात. ते याआधी जगभरात ठिकठिकाणी झालेले किंवा प्रदर्शनात दिसलेले आहेतच, पण आता खुराणा यांच्या किमान आठ व्हिडीओ-कलाकृती एकाच ठिकाणी पाहायची संधी मुंबईच्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ कलादालनात मिळते आहे.

एक प्रकारे, सोनिया खुराणा यांचा हा ‘मिनी रिट्रोस्पेक्टिव्ह’ किंवा त्यांच्या साद्यंत कलेची धावती कल्पना देणारं हे लघू-सिंहावलोकनी प्रदर्शन आहे, असं लक्षात येईल. खुराणा गेली सुमारे दोन दशकं कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. २००५ पासून, म्हणजे किमान गेली १२ र्वष त्यांच्या कलाकृती अनेक देशांत केवळ प्रदर्शित झाल्या असं नसून त्यांची चर्चा जगभरच्या कला-अभ्यासकांनी केली आहे. खुराणा यांचं एकल प्रदर्शन मुंबईत कधीही भरलं नव्हतं, तो योग आता आला आहे.

या प्रदर्शनातली आणखी एक हृद्य कलाकृती म्हणजे, भरचौकात आडवं पडून कबुतरांना दाणे खायला घालण्याची खुराणा यांची कृती. ही कृती त्यांनी पहिल्यांदा बार्सिलोना शहरात, स्पेनमध्ये केली. ‘तिथली माणसं कबुतरांना केवळ उच्छाद म्हणूनच पाहतात, त्यामुळे या परफॉर्मन्सच्या नंतर अनेक प्रेक्षकांनी माझी चौकशी केल्या- ‘ठीक आहेस ना?’ वगैरे..’ असं खुराणा सांगतात. कोणालाही जे अशक्य वाटतं तेवढंच आणि तेही अगदी सहज करणं, हे खुराणा यांच्या या कृतीचं इंगित होतं. पण त्यातून ‘ठीक आहेस ना?’ हा साधा वाटणारा प्रश्न आणि काही त्याहून गहन प्रश्न उभे राहिले. स्त्री, तरुण स्त्री, जाड शरीराची स्त्री, रस्त्यावर आडवं झोपल्यासारखं पडणं, त्याच अवस्थेत कबुतरांना खाऊ घालणं.. कबुतरांना अंगावर येऊ देणं.. या प्रत्येक गोष्टीबद्दल कुणाही माणसाच्या काही निश्चित कल्पना असतात, त्यांना हादरा देण्याचं काम ही कृती करते. विशेष म्हणजे, भरचौकात चाललेली ही कृती म्हणजे ‘कुणी तरी मुद्दाम केलेला परफॉर्मन्स आहे’ हेही रस्त्यावरल्या मंडळींना खरं वाटत नाही. चीनपासून अमेरिकेपर्यंत वा स्पेन, ब्रिटन आदी देशांमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सारख्याच होत्या. त्या अर्थानं, ही कलाकृती कबुतरांबद्दल किंवा महिलेनं भरचौकात झोप घेण्याबद्दल नव्हतीच.. ती प्रेक्षकांच्या संस्कृतीबद्दलची कृती होती. व्हिडीओ रूपातही ती कलाकृती, व्हिडीओ-प्रेक्षकांच्या सांस्कृतिक समजांची परीक्षा घेते.

हे सारं जणू स्वत:ला पणाला लावून करणं, ही ‘परफॉर्मन्स आर्ट’ या प्रकारातली एक शैलीच झाली आहे. मरिना अब्राहमोविच या त्या शैलीच्या उद्गात्या. स्वत:तून त्या समाजाबद्दल बोलतात. सोनिया खुराणादेखील हेच काम करतात आणि कलात्म वारसा म्हणून मरिना यांचा उल्लेख करतात.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी ‘गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ला जावं लागेल. दक्षिण मुंबईतल्या प्रसिद्ध ‘खादी भांडार’च्या मागचा आणि त्याहीमागचा (घ. त. मार्ग) असे दोन्ही रस्ते ‘क्वीन्स मॅन्शन’ या इमारतीत जाण्यासाठी सोयीचे आहेत. याच इमारतीत लिफ्टनं तिसऱ्या मजल्यावर ‘केमोल्ड’!

उद्याचा दिवस इतिहासाचा..

‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चा गेल्या १२५ वर्षांतला इतिहास दाखवणारं मोठं आणि खरोखरच भव्य प्रदर्शन सध्या एल्फिन्स्टन कॉलेजनजीकच्या (रीगल सिनेमाच्या चौकातील) ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ अर्थात एनजीएमएमध्ये भरलं आहे. ते पाहण्यासाठी दहा रुपये तिकीट आहे, पण त्याऐवजी १०० रुपये तिकीट समजा असतं तरीही पाहावं आणि माहितीसह चित्रं पाहिल्याचं समाधान मिळवावं, असं हे प्रदर्शन आहे. यापैकी ‘डू यू कम लक्ष्मी?’ (धुरंधर), ‘थ्री गर्ल्स’ (अमृता शेरगिल), ‘अमिरी इन फकिरी’ (हळदणकर)  ‘पोट्र्रेट ऑफ अ क्रिटिक’ (लँगहॅमर) यांसारखी काही चित्रं तर भारतीय कलेच्या इतिहासाचे टप्पे ठरली आहेत.

या आणि त्यापुढल्या, आतापर्यंतच्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी सुवर्णपदक’ विजेत्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न चित्रकार आणि एनजीएमएच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सुहास बहुळकर यांनी अनेकांच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी सुरू केला, त्यासोबत माहिती जमवणं, ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेही काम सुरू झालं. याची फळं म्हणजे हे प्रदर्शन आणि बहुळकरांनी लिहिलेला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी- इतिहास आणि वाटचाल’ हा कॅटलॉग.

त्या कामातले बरेवाईट अनुभव बहुळकरांच्याच तोंडून ऐकण्याची संधी उद्या- शुक्रवार १७ फेब्रुवारी २०१७ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात मिळणार आहे.. बहुळकरांना बोलतं करतील (आणि नेमके प्रश्न विचारतील) चित्रकार आणि नुकतंच कला-दस्तावेजीकरणाचं प्रदर्शन पुण्यात भरवणारे संकल्पक नितीन हडप. तेव्हा उद्याचा दिवस इतिहासाचा आहे.

Story img Loader