भाडेकरार संपुष्टात आल्याने जिमखान्याचा हक्क रद्द
जिल्हाधिकारी कार्यालयाने बॉम्बे जिमखान्याबरोबर केलेल्या भाडेपट्टय़ाच्या कराराची मुदत संपुष्टात आल्यामुळे हे मैदान सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले त्यासंदर्भातील फलकही मैदानात लावले आहेत. मात्र सर्वसामान्य मुले या मैदानात पाय ठेवायलाही बिचकत आहेत.
आझाद मैदानावरील भूकर क्रमांक ७३० आणि १/७३० ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २५ जानेवारी १९४१ रोजी बॉम्बे जिमखान्याला भाडेपट्टय़ाने देण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षी या भाडेपट्टय़ाची मुदत संपुष्टात आली असून भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र बॉम्बे जिमखान्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
भाडेपट्टय़ाच्या करारात मैदान सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्याची अट समाविष्ट करण्यात आली आहे, तरीही बॉम्बे जिमखान्यासमोरील मैदान साखळी घालून बंदिस्त करण्यात आले आहे. सर्वसामान्य मुंबईकरांनी मैदानात प्रवेश केल्यानंतर सुरक्षारक्षकांकडून त्यांची हकालपट्टी केली जात होती. भाडेपट्टा संपुष्टात आला असतानाही सर्वसामान्यांना मैदानात प्रवेश मिळत नसल्याची गंभीर दखल घेत पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत बॉम्बे जिमखान्यावर नोटीस बजावली. या नोटीसला दिलेल्या उत्तरात मैदान जनतेसाठी कायम खुले असल्याचे बॉम्बे जिमखान्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत पालिकेला सूचना देत हे मैदान खुले करण्यात आल्याचे फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने शनिवारी याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी मैदान खुले करण्यात आल्याचा फलक मैदानात लावला.
भाडेपट्टय़ातील अटीनुसार मैदान जनतेसाठी कायम खुले असल्याचे बॉम्बे जिमखान्याने कबूल केले आहे, मात्र जिमखान्यातर्फे होणारे विविध खेळांचे सामने वगळता अन्य वेळेत सर्वसामान्यांना या मैदानाचा खेळासाठी वापर करता येईल, असा पवित्रा जिमखान्याने घेतला आहे. मैदानामध्ये फलक लावल्याने जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संदर्भात खुलासा करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाडेपट्टा संपुष्टात आला आहे आणि त्याचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे हे मैदान सर्वसामान्य नागरिकांना खेळण्यासाठी खुले आहे यावर पालिका ठाम आहे.