मुंबई : अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. ती सापडत नसल्याने याचिकेअभावी तीन वेळा सुनावणी होऊ शकली नसल्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच ही कागदपत्रे सापडत नसल्यास संबंधित पक्षकारांच्या मदतीने ती पुन्हा तयार करावीत आणि पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर सादर करावीत, असे आदेश न्यायालयाने निबंधक कार्यालयाला दिले.
या प्रकरणातील सहआरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्वत:ला दूर केले होते, ही बाब प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायमूर्ती डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ममता हिच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचे स्पष्ट केले. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममतासह अन्य आरोपींविरोधात ठाणे येथील पोलिसांनी २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ममताने वकील माधव थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका तिसऱ्यांदा सुनावणीसाठी आली. त्या वेळी ममता हिने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे अद्यापही सापडलेली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे न्यायालयाच्या निबंधक कार्यालयातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.