मुंबई : दोन वर्षांपूर्वी वांद्रे वरळी सागरी सेतूवर आपल्या कारने अनेक वाहनांना धडक देऊन चारजणांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद सरफराज मोहम्मद युसूफ शेख (४२) याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या अपघातामागे शेख याचा कोणताही कुहेतू नव्हता हे विचारात घेऊन त्याला जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अपघातात शेख स्वत: गंभीररीत्या जखमी झाला होता आणि सध्या तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचेही न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने त्याला जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. पोलिसांनी या प्रकरणी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता शेख याचा या घटनेमागे कोणताही वाईट हेतू नव्हता किंवा हे पूर्वनियोजित कृत्यही नसल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते. सरकारी वकिलांनीही ही बाब युक्तिवाद करताना मान्य केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. त्याचप्रमाणे, त्याला जामीन मंजूर करताना पाच वर्षांसाठी चालक परवाना पोलिसांच्या हवाली करण्याचे आदेश दिले.

आपल्याला १५ वर्षांपासून वाहन चालवण्याचा अनुभव आहे आणि यापूर्वी आपण कधीही अपघात केलेला नाही. परंतु, घटनेच्या दिवशी गाडी चालवताना अचानक एकाग्रता कमी होऊन आपल्याला भोवळ आली आणि आपले गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला, असा दावा शेख याने जामिनाची मागणी करताना केला होता.

दरम्यान, ९ नोव्हेंबर २०२३ रोजी वांद्रे वरळी सागरी सेतूवरून जात असताना शेख याच्या इनोव्हा कारने सेतूवरील टोल नाक्याजवळ अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले होते. शेख हाही या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्यावर, बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून चारजणांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याच्या जामिनासाठीच्या याचिकेवर निर्णय देताना हा एक गंभीर अपघात होता. त्यात चारजणांना जीव गमवला होता, तर काहीजण जखमी झाले होते, तथापि, आरोपीने घटनेच्या वेळी मद्यपान केले नव्हते आणि तो स्वतःदेखील अपघातात गंभीररीत्या जखमी झाला होता, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. शिवाय, बराच काळ कारागृहात राहिल्याने शेख हा भ्रमिष्ट झाला असून त्याला मानसिक मूल्यांकन व उपचारांसाठी अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिडचिड आणि आक्रमक वर्तन, झोपेचा त्रास, इतरांना न दिसणारे चेहरे दिसणे यासारख्या आजारांनी शेख ग्रस्त आहे. त्याला मानसिक मूल्यांकन करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचेही न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc grant bail to driver in bandra worli sea link accident that killed four in 2023 mumbai print news zws