मुंबई : आजारी वडिलांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या डोंबिवलीस्थित एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या विद्यार्थ्याचे तरुण वय आणि त्याला कट्टर गुन्हेगार होण्यापासून रोखण्याची गरज असल्याचे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले.

गेल्या दोन वर्षांपासून हा तरुण वडिलांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात होता. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य मान्य केले, परंतु घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा विचार एकलपीठाने त्याला जामीन मंजूर करताना प्रामुख्याने केला. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला आरोपी शिकत असून अनेक अडचणींनंतरही त्याचा शैक्षणिक आलेख चांगला राहिला आहे. त्याची आई घरकाम करते. त्याचे वडील मद्यापी होते आणि घटनेच्या वेळी मूत्रपिंडाच्या आजारामुळे अंथरुणाला खिळले होते.

डॉक्टरांनी न सांगितलेले औषध घेतल्यावरून आरोपीचा घटनेच्या दिवशी म्हणजेच २२ फेब्रुवारी २०२३ रोजी वडिलांशी वाद झाला. वडिला़ंकडून अत्याचार सुरूच राहिल्याने आरोपीने स्वयंपाकघरातील चाकूने त्यांचा गळा चिरला, असा त्याच्यावर आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने घराला कुलूप लावले, तसेच शेजाऱ्याकडून शंभर रुपये उधार घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली.

दुसरीकडे, त्याने केलेले कृत्य गंभीर असून त्याने रागाच्या भरात नाही, तर थंड डोक्याने वडिलांचा खून केल्याचा दावा पोलिसांच्या वतीने करण्यात आला. तथापि, ही घटना पूर्वनियोजित नव्हती, तर असह्य शाब्दिक गैरवापराचा परिणाम होती. शिवाय, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असून या घटनेमुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा दावा आरोपीच्या वकिलातर्फे करण्यात आला.

Story img Loader