मुंबई : पती आणि सासूच्या छळाला कंटाळून गेल्या वर्षी आपल्या चार महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याचिकाकर्तीविरोधातील खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही आणि तो सुरू झाला तरी निकाली निघण्यासाठी बराच वेळ लागेल. याचिकाकर्तीला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. शिवाय, तिचे तरूण वय आणि तिने कारागृहात घालवलेला नऊ महिन्यांचा कालावधी आणि प्रकरण पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारलेले असल्याची बाब विचारात घेता याचिकाकर्तीची जामिनावर सुटका करण्यात येत असल्याचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी युक्ता रोकडे हिला जामीन मंजूर करताना नमूद केले.
हेही वाचा >>> अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरण : देशभरात १३ ठिकाणी ईडीचे छापे
याचिकाकर्तीने वकील अनिकेत वगळ आणि कुणाल पेडणेकर यांच्यामार्फत जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. पोलिसांच्या तक्रारीनुसार, याचिकाकर्तीच्या तक्रारीवरूनच २१ मार्च २०२२ रोजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचिकाकर्तीने केलेल्या तक्रारीनुसार, २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक महिला घरी आली आणि तिने सासूची चौकशी केली, परंतु, सासू घरी नव्हती. त्या महिलेने आपल्या नाकावर रुमाल ठेवून बेशुद्ध केले. शुद्धीवर आल्यावर बाळाला हातात घेतले तर त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. शिवाय, बाळाची मान चिरण्यात आली होती. तपासादरम्यान सीसी टीव्हीत कैद चित्रिकरणावरून अज्ञात महिला त्यावेळी परिसरात दिसलीच नाही.
हेही वाचा >>> ट्रॉम्बे परिसरात अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक
वैद्यकीय तपासणीत देखील याचिकाकर्तीने स्वत:हून दुखापत केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, तिला अटक केली. सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने याचिकाकर्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपण निर्दोष असून या प्रकरणात आपल्याला खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावा याचिकाकर्तीने जामिनाची मागणी करताना केला होता. युक्ता हिने पती आणि सासूच्या छळाला कंटाळून आपल्या चार महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा दावा पोलिसांचा आहे. तिने स्वत:चा बचाव करण्यासाठी नंतर खोटी माहिती दिल्याचा दावाही पोलिसांचा आहे. तर, प्रसूतीनंतर याचिकाकर्ती नैराश्याने त्रस्त होती आणि तिचे मद्यपी पती व सासूशी सतत भांडण होत होते.