याचिकेवर सुनावणी होत नसल्याने याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांना त्यासंदर्भातील ई-मेल पाठवला. ही बाब लक्षात आल्यानंतर न्यायमूर्ती पटेल यांनी ही याचिका ऐकण्यापासून बुधवारी स्वत:ला दूर केले. याचिकाकर्त्यांच्या या कृतीबाबत न्यायमूर्ती पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती पटेल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, न्यायमूर्ती पटेल यांनी याचिकाकर्त्यांने त्यांना वैयक्तिकरीत्या तक्रारीचा ई-मेल पाठवल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा >>> मुंबई : पश्चिम उपनगरांतील हवेच्या दर्जात सुधारणा; माझगाव, शीव, वरळी, बीकेसी, विमानतळ येथील हवा वाईट
तसेच, ही याचिका आपण ऐकू शकत नसल्याचे स्पष्ट करून प्रकरणापासून स्वत:ला दूर केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर याचिकाकर्त्यांने पाठवलेल्या या ई-मेलबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्याच्या वकील कांचन पमनानी यांनी न्यायालयाला सांगितले व न्यायमूर्तीची माफी मागितली. त्याचप्रमाणे, प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंतीही केली. न्यायमूर्ती पटेल यांनी मात्र या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्यांला दुसऱ्या खंडपीठाकडे याचिका सादर करण्याची सूचना केली. न्यायमूर्तीना वैयक्तिक ई-मेल करणे हे एकप्रकारे प्रकरणाशी तडजोड करण्यासारखे आहे. प्रकरण किती काळासाठी प्रलंबित असले तरी, याचिकाकर्ते न्यायमूर्तीना वैयक्तिकरित्या ई-मेल पाठवू शकत नाही. त्यामुळे, आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती पटेल यांनी स्वत:ला या प्रकरणापासून दूर करताना नमूद केले.