मुंबई : चित्रकार हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंबानी यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात केलेले अपील निकाली निघेपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची चित्रकार चिंतन उपाध्याय याची मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येसाठी प्रवृत्त करणे आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपात दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात चिंतन याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अपील निकाली काढेपर्यंत आपली शिक्षा स्थगित करावी आणि आपली जामिनावर सुटका करावी, अशी चिंतन याने मागणी केली होती.
हेही वाचा >>> ‘एनआयए’कडून २० हून अधिक जणांची चौकशी; ‘आयसिस’शी संबंध असल्याचा आरोप
न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने त्याचे अपील दाखल करून घेत शिक्षा स्थगितीबाबत सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले होते. त्यावर, तपशीलवार सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने चिंतन याची अपील निकाली निघेपर्यंत शिक्षा स्थगित करण्याची मागणी फेटाळली. गुन्ह्यात चिंतन याचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे आहेत, असेही न्यायालयाने त्याला दिलासा नाकारताना स्पष्ट केले. दरम्यान, प्रकरणातील सहआरोपी प्रदीप राजभर याचा कबुलीजबाब बळजबरीने घेण्यात आला होता. त्यानंतरही, सत्र न्यायालयाने या कबुलीजबाबाची स्वत:हून दखल घेऊन, तो स्वीकारार्ह आणि प्रमाणित मानला. सत्र न्यायालयाची ही कृती योग्य नाही, असा दावा चिंतन याने केला आहे. न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवण्यासाठी याच कबुलीजबाबाचा आधार घेऊन आपल्याविरोधात पुरेसे पुरावे नसतानाही आपल्याला दोषी ठरवण्यात आल्याचा दावाही चिंतन याने अपिलात केला आहे.