शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ‘मोक्का’अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला कुख्यात गुंड अरुण गवळी याला नियमित जामीन देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आपली वृद्ध आई खूप आजारी असून तिला या वयात आपली गरज असल्याचा दावा करत गवळीने जामिनाची मागणी केली होती. मात्र आईला सांभाळायला बरेच जण आहेत, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने गवळीचा जामीन फेटाळून लावला.
२ मार्च २००७ रोजी जामसंडेकर यांची त्यांच्या घरी जाऊन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गवळीसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. २०१३ मध्ये मोक्का न्यायालयाने गवळीला कट रचल्याप्रकरणी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गवळीच्या मुलाचे लग्न होते. त्या वेळी नागपूर न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला होता. पण त्याचवेळी गवळीने नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. आपली वृद्ध आई खूप आजारी असून तिला आपल्या आधाराची गरज आहे, असा दावा करत त्याने जामिनाची विनंती केली होती.