मुंबई : औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारची ही कृती राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारी असल्याचे ताशेरेही ओढले.  आरोग्य व्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, यापूर्वी मंजूर केलेला निधी पूर्णपणे का वितरित केला नाही आणि उपलब्ध झालेला निधीही पूर्णपणे का वापरला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला त्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. रुग्णालयांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी केली हे स्पष्ट करण्याचे आदेश  दिले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हर्णे बंदर अरेबियन सी हम्पबॅक व्हेलचे प्रमुख ठिकाण; भारतीय वन्यजीव संस्थेची नोंद

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठया संख्येने मृत्युसत्र घडल्याच्या घटनेची दखल घेऊन आणि त्याबाबत चिंता व्यक्त करून न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी, आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी वापरला जात नसल्याबाबत मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने या प्रकरणी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले तर, आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात येणारा निधी पूर्णपणे उपलब्ध केला जात नाही. शिवाय, उपलब्ध करून देण्यात आलेला निधीही पूर्णपणे वापरला जात नसल्याचे दिसून येते यावर न्यायालयाने बोट ठेवले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc slams maharastra government for non utilization of sanctioned funds on health care zws
Show comments