Ravindra Waikar Amol Kirtikar plea Bombay HC : वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदार रवींद्र वायकर यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वायकरांविरोधात समन्स जाहीर केलं आहे. वायकरांनी ज्यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत निसटता विजय मिळवला होता त्या अमोल कीर्तिकरांनीच वायकरांना अडचणीत आणलं आहे. कीर्तिकरांनी उच्च न्यायालयाकडे वायकरांचा विजय रद्द करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती संदीप व्ही. माने यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने सोमवारी (२९ जुलै) सुनावणी केली. या सुनावणीवेळी न्यायमूर्ती म्हणाले, वायकर व अन्य प्रतिवाद्यांनी २ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर राहून कीर्तिकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर द्यावं.
मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना समन्स जारी केलं आहे. न्यायालयाने २ सप्टेंबरपर्यंत याप्रकरणी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. अमोल कीर्तिकर हे अवघ्या ४८ मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर व पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच कीर्तिकर यांनी दावा केला आहे की, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती, जी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली होती.
अमोल कीर्तिकरांचा आरोप काय?
कीर्तिकर यांनी आरोप केले आहेत की मतमोजणी केंद्रावर वायकरांचे निकटवर्तीय व कार्यकर्ते मोबाईल फोन घेऊन वावरत होते. कीर्तिकरांनी दावा केला आहे की वायकरांचे पदाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलाजवळच्या खुर्चीवर बसून होते, त्याउलट आम्हाला (ठाकरे गट) आत प्रवेशही दिला जात नव्हता.
मतमोजणीच्या दिवशी काय झालं होतं?
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना विजयी केलं होतं. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमोजणीनंतरही अधिकाऱ्यांनी कीर्तिकरांना विजयी घोषित केली. त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी केली गेली, यावेळी पोस्टल मतांचीही मोजणी झाली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी वायकरांना ४८ मतांनी विजयी घोषित केलं. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचं काम पारदर्शीपणे केलं नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. रवींद्र वायकर यांनी टपाल मतपत्रिका पुनर्मोजणीची मागणी केली. त्याचवेळी फेरमतमोजणी देखील पार पडली. अखेर वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं.