मुंबई : बँक कर्ज गैरव्यवहाराप्रकरणी झालेली अटक आणि विशेष न्यायालयाने सुनावलेल्या कोठडीला आव्हान देणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी मान्य केली. तसेच या याचिकेवर सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन कोचर दाम्पत्याच्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने शुक्रवारी ठेवली.
सीबीआयने केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा करून कोचर दाम्पत्याने त्याविरोधात गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच त्यांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने कोचर दाम्पत्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
हेही वाचा >>> विश्लेषण: चंदा कोचर यांच्यासाठी पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन कसे ठरले डोकेदुखी? काय आहे 3250 कोटींच्या कर्जाचं प्रकरण?
न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर कोचर दाम्पत्याच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी कोचर दाम्पत्याने न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर नियमित जामिनासाठी अर्ज का केला नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्यावर कोचर दाम्पत्याने अटक आणि विशेष न्यायालयाने सुनावलेल्या कोठडीला आव्हान दिले आहे. तसेच अटक बेकायदा ठरवून त्यांची कारागृहातून तातडीने सुटका करण्याची मागणी केल्याचे कोचर दाम्पत्यातर्फे न्यायालयाला सांगितले. शिवाय पुढील आठवड्यात कोचर यांच्या मुलाचे लग्न असल्याचेही कोचर दाम्पत्याच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता अमित देसाई आणि विक्रम चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या प्रकरणात चंदा कोचर यांना अटक न करण्याची हमी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कोचर यांची याचिका निकाली निघेपर्यंत त्यांच्या अंतरिम सुटकेचे आदेश देण्याची मागणी कोचर दाम्पत्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली.
हेही वाचा >>> अग्रलेख : नवा दहशतवाद!
दुसरीकडे कोचर दाम्पत्याच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता राजा ठाकरे यांनी वेळ मागितला. न्यायालयाने सीबीआयला त्यासाठी शुक्रवारपर्यंत वेळ देऊन प्रकरणाची सुनावणीही त्याच दिवशी ठेवली.
धूत यांचेही अटकेला आव्हान
या प्रकरणी व्हिडीओकॉन समुहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाळ धूत यांनीही सीबीआयने त्यांना केलेल्या अटकेला विशेष न्यायालयात आव्हान दिले. तपास अधिकाऱ्यांनी दबावाखाली त्यांना अटक केल्याचा दावा धूत यांनी केला आहे. तसेच त्यांना केलेली अटक बेकायदा ठरवण्याची मागणी केली आहे.