मॅगी नूडल्सवर बंदी घालण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नेसले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नेसले कंपनीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानंतर देशभरात वेगवेगळ्या राज्यांत मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारनेही मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली होती. या बंदीविरोधात नेसलेने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा आणि दर्जा कायदा २०११चा सरकारने लावलेल्या अर्थाचा फेरआढावा घ्यावा, यासाठी कंपनीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असली तरी देशभरातून मॅगी नूडल्सचे सर्व नऊ प्रकार कंपनी परत घेणार आहे. यापूर्वीही मॅगी नूडल्स बाजारातून परत घेण्यात येतील, असे कंपनीने म्हटले होते.

Story img Loader