दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या ‘प्रोबेट’ला जयदेव ठाकरे यांनी ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे अंतरिम दिलासा देता येईल काय, असा सवाल न्यायालयाने जयदेव ठाकरे यांच्या वकिलांना सोमवारी केला. याबाबत उच्च न्यायालयांचे निकाल विचारात घेऊन त्यावर युक्तिवाद करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे जयदेव यांनी अशाप्रकारे केलेला अर्ज दाखल करून घ्यायचा की नाही यावर १० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘प्रोबेट’बाबत जयदेव ठाकरे यांनी अंतरिम दिलासा मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस दिवाणी दंडसंहितेनुसार, ‘प्रोबेट’बाबत ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे अर्ज करता येऊ शकतो का आणि त्याबाबत सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे निकाल विचारात घेतले आहेत का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर या प्रकरणी ‘दोन मृत्यूपत्रां’चा वाद नसल्याचे सांगत उद्धव यांच्या वकिलांनी जयदेव यांचा अर्ज दाखल करण्यायोग्य नसल्याचे सांगितले. मात्र आपला अर्ज दाखल करून घेण्यायोग्य असल्याचे पुन्हा एकदा जयदेव यांच्या वकिलांनी स्पष्ट केल्यावर आधी हा मुद्दा निकाली काढण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासाठी न्यायालयाने स्वत:च उच्च न्यायालयाच्या काही निकालांचे दाखले देत ते विचारात घेऊन १० मार्च रोजीच्या सुनावणीच्या वेळेस त्याबाबत युक्तिवाद करण्याचे न्यायालयाने दोन्ही पक्षांना सांगितले. दरम्यान, हा मुद्दा निकाली निघाल्यानंतर ‘प्रोबेट’च्या कुठल्या मुद्दय़ावर युक्तिवाद ऐकायचे हे निश्चित केले जाईल, असेही स्पष्ट केले. ‘प्रोबेट’बाबतच्या मुद्दय़ाबाबत दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे उघड करणे आवश्यक आहेत. ती सादर करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून या वेळी वेळ मागण्यात आला. त्यांची ती मागणी मान्य करीत न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी ७ एप्रिल रोजी ठेवली आहे.
‘प्रोबेट’ म्हणजे काय?
मृत्यूपत्राची वैधता सिद्ध करून न्यायालयाकडून त्यावर शिक्कामोर्तब करून घेणे म्हणजे ‘प्रोबेट’ होय. परंतु, ज्या व्यक्तीला मृत्यूपत्र खोटे आहे, असे वाटत असेल त्याला न्यायालयात अर्ज दाखल करून या ‘प्रोबेट’ला आक्षेप घेता येतो. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत हेच घडले आहे. उद्धव यांनी ‘प्रोबेट’ दाखल केले आहे, तर जयदेव यांनी त्यास आक्षेप घेतला आहे.