मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यास सीबीआयने केलेला विरोध उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवला. तसेच, विशेष न्यायालयाने याबाबत दिलेला आदेश रद्द करून इंद्राणी हिच्या परदेशवारीस नकार दिला. इंद्राणीला परदेशात जाऊन काम करणे आवश्यक असल्याचे कोणतेही तार्किक कारणे विशेष न्यायालयाने तिची परदेशी जाण्याची मागणी मान्य करताना दिलेली नाहीत. तसेच, इंद्राणी हिचा अर्ज गुणवत्तेच्या आधारे मान्य करण्यात आल्याचे स्पष्ट करणारी टिप्पणीही विशेष न्यायालयाने केलेली नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवताना नोंदवले. तसेच, इंद्राणीला पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे अथवा ऑनलाईन पद्धतीने भारतातूनच काही कामे करायची असल्यास सरकारने तिला सहकार्य करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नायर रुग्णालय विनयभंग प्रकरण : निलंबित डॉक्टराविरोधात आणखी १० विद्यार्थिनींच्या तक्रारी

विशेष सीबीआय न्यायालयाने १९ जुलै रोजी इंद्राणी हिला तीन महिन्यांसाठी अधूनमधून १० दिवसांसाठी युरोप (स्पेन आणि युके) प्रवास करण्याची परवानगी दिली होती. विशेष न्यायालयाचा हा आदेश कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आणि मनमानी असल्याचा दावा करून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी सीबीआयने वकील श्रीराम शिरसाट यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली होती. इंद्राणीवर खुनाचा गंभीर खटला सुरू असून तिच्यावर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, तिला परदेशात जाण्यास परवानगी दिल्यास ती परतण्याची शक्यता कमी आहे, असा दावा सीबीआयने केला होता. सीबीआयच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय देताना न्यायमूर्ती चांडक यांच्या एकलपीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवून इंद्राणी हिला परदेश दौरा करण्यास नकार दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court denies foreign travel permission to indrani mukherjea mumbai print news zws