मुंबई : दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने निराश होऊन चार महिन्यांच्या मुलीला राहत्या घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केल्याचा आरोप असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. याचिकाकर्तीविरुद्धचे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. शिवाय, या प्रकरणी आरोप निश्चितीही झालेली नाही. त्यामुळे, खटला पूर्णत्वास जाण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यातच आरोपी महिला असून एक वर्ष आणि अकरा महिन्यांहून कारागृहात आहे. तिला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही, अशा परिस्थितीत याचिकाकर्तीला आणखी कोठडीत ठेवणे म्हणजे खटला चालविण्यापूर्वीच तिला शिक्षा सुनावण्यासारखे आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने नोंदवले. तसेच, याचिकाकर्ती सपना मकदूम हिला जामीन मंजूर केला. सपना हिच्या वतीने वकील सत्यम निंबाळकर आणि ओमकार चितळे यांनी युक्तिवाद केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: लैगिंक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला जाळल्याचा आरोप; आरोपीला फाशीची शिक्षा

याचिकाकर्तीने सुरुवातीला काळाचौकी पोलीस ठाण्यात मुलगी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी एक महिला जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी विकण्यासाठी तिच्या घरी आली आणि आपण व्यग्र असताना त्या महिलेने आपल्याला बेशुद्ध केले. तसेच, आपल्या चार महिन्यांच्या मुलीला घेऊन महिला पसार झाली, असा दावा याचिकाकर्तीने पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीत केला होता. घटनेच्या वेळी आपण घरात एकटेच होतो, असेही तिने पोलिसांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी सपनाची कसून चौकशी केली असता तिनेच मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचे कबूल केले. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर तिला मुलगा हवा होता, परंतु, पुन्हा मुलगी झाल्याने तिने तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. तिच्या कबुलीजबाबानंतर सपनाला तात्काळ अटक करण्यात आली. सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याचिकाकर्तीला जामीन दिल्यास पहिल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. तसेच, तिच्या जामिनाला विरोध करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court grants bail to woman booked for killing four month old girl for wanting boy mumbai print news zws