जे डे हत्या प्रकरण : पोलिसांचे अपील फेटाळले

पत्रकार जिग्ना वोरा ही ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा वा तिला त्याची पूर्ण जाणीव असल्याचा कुठलाही थेट पुरावा नाही, असा निर्वाळा देत याप्रकरणी जिग्ना हिची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी योग्य ठरवला.

याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याच्यासह नऊ जणांना विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने गेल्या वर्षी दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. तर पत्रकार जिग्ना आणि पॉल्सन जोसेफ या दोघांची निर्दोष सुटका केली होती. डे यांच्या विरोधात राजनला भडकावल्याचा प्रमुख आरोप जिग्नावर होता. विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केल्याच्या विरोधात पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने मंगळवारी केवळ जिग्नाच्या सुटकेविरोधात पोलिसांनी केलेल्या अपिलावर सुनावणी घेतली. त्या वेळी जिग्ना हिचा या हत्येच्या कटात सहभाग होता आणि तिनेच डे यांच्याविषयीची सगळी माहिती उपलब्ध केली होती, असा दावा विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. ‘बातमीच्या निमित्ताने पत्रकार गुन्हेगारांच्या संपर्कात असतात. मात्र जिग्नाने डे यांच्यावरील सुडातून त्यांच्या मोटारसायकलच्या क्रमांकाची माहिती राजनला उपलब्ध केली. शिवाय ती सतत डे यांच्याविषयी राजनकडे तक्रार करत असे. ती या हत्येच्या कटात सहभागी होती, तिला त्याची पूर्ण जाणीव होती’, असा दावा न्यायालयात करण्यात आला.

जिग्ना आणि राजन यांच्यातील फोनवरील संभाषण तसेच अन्य पुराव्यांतून तिने भडकावल्याने डे यांची हत्या झाल्याचे सिद्ध झालेले नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. राजनने गुन्ह्य़ाची कबुली ही न्यायालयीन अधिकारी वा न्यायालयासमोर दिलेली नाही. त्यामुळे तिचा या हत्येच्या कटात सहभाग होता, याचा थेट पुरावा पुढे आलेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Story img Loader