मुंबईत बनावट लसीकरण शिबीराच्या माध्यमातीन दोन हजारांपेक्षा अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात ही माहिती दिली आहे. करोनाची लस मिळण्यामध्ये लोकांना होणाऱ्या अडचणींसंबंधी दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने ही माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी हायकोर्टाने मुंबई महापालिकेला लसीकरण घोटाळ्यातील पीडितांच्या शरिरात अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण झाल्या आहेत का याची तपासणी करण्यासही सांगितलं आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांनी मुंबई महापालिकेला अनधिकृत लस देणाऱ्यात आलेल्यांची प्रकृती तपासण्याचे आदेश दिले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक लसीकरण घोटाळ्याला बळी पडले असल्याची दखल घेत हायकोर्टाने म्हटलं की, “त्या लोकांची नेमकी काय स्थिती आहे याची आम्हाला चिंता आहे. त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. बनावट लसीचे काही दुष्परिणाम जाणवत आहेत का याची माहिती घ्या. त्यांच्या शरिरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत का? त्यांना सलाईन किंवा इतर काही दिलं असंल तर काय?”.

लस घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा

यावेळी हायकोर्टाने सरकारी यंत्रणांना या घोटाळ्यात नेमके किती लोक बळी पडले आहेत अशी विचारणा केली. यावेळी २०५३ लोकांना याचा फटका बसला असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. यामध्ये बोरीवलीमधील ५१४, वर्सोवामधील ३६५, कांदिवलीमधील ३९८, लोअर परळमधील २०७, मालाड पश्चिमेकडील ३० आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचा समावेश आहे.

बनावट लसीकरण रोखा

कोर्टाने यावेळी सरकारला फटकारत, “तुम्ही इतके प्रयत्न करुनही हे झालं. तुम्ही काय करत होतात?,” अशी विचारणा केली. सरकारने यावेळी कोर्टाकडे हे प्रकरण हाताळण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी मागितला आहे. भविष्यात असे घोटाळे होऊ नयेत यासाठी योजना आखली जावी याकरिता कोर्टाने सरकारला पाच दिवसांचा अवधी दिला आहे.

काय आहे प्रकरण –

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामार्फत लसीकरण शिबीर आयोजित करू, असे सांगत मुख्य आरोपी राजेश पांडे आणि त्याच्या साथीदारांनी शहरात नऊ ठिकाणी बनावट शिबिरे घेतली. हा प्रकार कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लातील रहिवाशांनी उघडकीस आणला. शिबीर आटोपल्यानंतर रहिवाशांच्या हाती पडलेल्या प्रमाणपत्रांवर अन्य रुग्णालयं, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांची नावे होती. रहिवाशांच्या नावांसह अन्य तपशीलही चुकीचे होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी कोकिलाबेन रुग्णालयाकडे चौकशी केली. तेव्हा असे कोणतेही शिबीर घेतलेले नाही, असे रुग्णालयाने स्पष्ट केलं.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडे आणि त्याच्या टोळीने हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लातील रहिवाशांकडून लसीकरणासाठी प्रत्येकी १ हजार २५० रुपये आकारले होते.

कांदिवलीव्यतिरिक्त अंधेरी, वांद्रे येथील चित्रपटनिर्मितीशी संबंधित कंपन्यांनी दिलेल्या तक्रारीआधारेही याच टोळीविरोधात वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन कंपन्यांनी पांडेच्या माध्यमातून आपल्या कर्मचारीवर्गासाठी शिबीर आयोजित के ले होते. हा सर्व प्रकार उघड होताच बोरिवलीतील ‘आदित्य कॉलेज ऑफ डिझाइन स्टडीज’ या महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळानेही या टोळीविरोधात पोलीस तक्रार केली. या तक्रारीआधारे बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली. प्रमुख आरोपी पांडे आणि डॉ. त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

पोलिसांचे आवाहन

बनावट लसीकरण, लस घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची कोणतीही संशयित घटना किंवा संशयित व्यक्तीबाबत माहिती असल्यास मुख्य नियंत्रण कक्ष (१००), २२६२५०२०, २२६२७९८३, २२६२३०५४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Story img Loader