चंद्रभागा आणि तिचा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्याची अट घालत आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर चंद्रभागेच्या पात्र व वाळवंटामध्ये भजन-कीर्तन, प्रवचन, जागरासाठी तात्पुरत्या राहुटय़ा उभाण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी अखेर परवानगी दिली. एवढेच नव्हे, तर भविष्यात पंढरपूरात शौचालयांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे बजावत आषाढी एकादशी व अन्य तीन एकादशींसाठी वर्षांतील २० दिवस अशाप्रकारे दिलासा दिला जात असल्याचेही न्यायालायने स्पष्ट केले.
चंद्रभागा प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने तिच्या वाळवंटात आणि पात्रात कुठल्याही प्रकारच्या कामास उच्च न्यायालयाने एकदा नव्हे तर दोनवेळा आदेश देऊन बंदी घातली होती. असे असतानाही २६ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने कायदा सुव्यवस्थेची सबब पुढे करत चार दिवसांसाठी चंद्रभागेच्या पात्रात व वाळवंटात भजन-कीर्तनासह तात्पुरत्या राहुटय़ा उभारण्याच्या परवानगीसाठी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने बंदीच्या आदेशात सुधारणा करत आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर २६ ते २९ जुलै या कालावधीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरासाठी तात्पुरते मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली. मात्र नदी परिसराचे प्रदूषण होऊ नये यासाठी तेथे निवास व जेवण करण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. तसेच वर्षांत २० दिवसांसाठी हा दिलासा देत ते २० दिवस नेमके कोणते हे निश्चित करण्याची जबाबदारी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
सरकारच्या वतीने महाधिवक्ता अनिल सिंह यांनी बाजू मांडली तर वारकरी प्रबोधन महासमितीच्या अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने राहुटय़ा व भजन-कीर्तनासाठी दिलेली जागा मंदिरापासून खूप दूर असल्याचे नमूद केले होते. शौचालयांचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने सरकारला राहुटय़ांसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी अमायकस क्युरी मिहिर देसाई यांनी केली होती.