Bombay High Court on Woman false maintenance cases Against Men : घटस्फोट व देखभाल खर्चाच्या (पोटगी) नावाखाली अनेक पुरुषांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका महिलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन देण्यास नकार दिला आहे. या महिलेवर आरोप आहे की लग्न न करताच ती अनेक पुरुषांकडून देखभाल खर्च मिळावा यासाठी त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करायची. त्यानंतर न्यायालयाबाहेर आर्थिक तडजोडी करून तक्रार मागे घेत होती. याप्रकरणी आरोपी महिलेसह दोन वकिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन वकील त्या महिलेच्या या कटांमध्ये सामील असायचे.

आरोपी महिलेला याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर तिने न्यायालयात जामीन अर्ज केला होता. आधी न्यायदंडाधिकारी व नंतर सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर या महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचं दार ठोठावलं. मात्र उच्च न्यायालयाने देखील तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

हे ही वाचा >> Sadhguru : “स्वतःच्या मुलीचं लग्न लावणारा इतरांच्या मुलींना…”, उच्च न्यायालयाचा सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सवाल

नेमकं प्रकरण काय?

एका व्यक्तीने या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याने तक्रारीत म्हटलं होतं की तो या महिलेला कधी भेटलाच नाही. तरीदेखील तिने त्याच्याविरोधात देखभाल खर्च मिळावा यासाठी खटला दाखल केला आहे. पीडित इसमाने न्यायमूर्तींना सांगितलं की दोन वकिलांबरोबर मिळून त्यांनी माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर तीन जणांविरोधात अशा प्रकारची तक्रार दाखल केली आहे. ही महिला खोटं नाव व ओळख वापरून अशा प्रकारचे खटले भरते. तसेच या पीडित व्यक्तीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं की दोन खटल्यांच्या प्रकणात या महिलेने व तिच्या वकिलांनी मिळून पीडितांबरोबर न्यायालयाबाहेर सेटलमेंट केली. पीडितांकडून मोठी रक्कम वसूल केल्यानंतर महिलेने तक्रार मागे घेतली.

हे ही वाचा >> Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

या महिलेविरोधात पीडित इसमाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते. ही महिला तिच्या टोळीतील वकिलांच्या मदतीने लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे. ती महिला वेगवगळ्या पुरुषांविरोधात तक्रार दाखल करायची व त्यानंतर न्यायालयाबाहेर सेटलमेंट करायची. पैसे मिळाल्यानंतर ती तक्रार मागे घ्यायची. याप्रकरणी महिलेविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे. इंडिया टूडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.