दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेत एकतृतीयांश हक्क मागण्यासाठी जयदेव ठाकरे यांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. बाळासाहेबांच्या मालमत्तेत हक्क मागताना योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब जयदेव यांनी केलेला नाही, असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. मात्र जयदेव यांना स्वतंत्र याचिकेद्वारे हा दावा करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही न्यायालयाने या वेळी सूचित केले.
बाळासाहेबांच्या मृत्युपत्रासंदर्भात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘प्रोबेट’ दाखल केले आहे. त्यावर या ‘प्रोबेट’वर निर्णय देण्यापूर्वी आपलीही बाजू ऐकून घेण्याबाबत जयदेव यांनी ‘कॅव्हेट’ केले आहे. तसेच हे ‘कॅव्हेट’ मालमत्तेत हक्क मागणारा दावा म्हणून विचारात घेण्याची मागणी जयदेव यांनी सोमवारी अर्जाद्वारे केली होती. परंतु अशाप्रकारे जयदेव यांना मालमत्तेत हक्क मागता येऊ शकत नाही आणि त्यांनी तो मागण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही, असे नमूद करीत न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. जर एखाद्याला वारसा हक्काबाबत दाखल याचिकेला विरोध करायचा असेल तर ‘लेटर्स ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ वा स्वतंत्र याचिकेद्वारे तो करता येऊ शकतो. ही प्रक्रिया अवलंबिली गेली तरच उच्च न्यायालय आयुक्तांना मालमत्तेच्या वितरणासंदर्भात निर्देश देऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वीही मृत्युपत्राबाबतच्या ‘प्रोबेट’ला ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे आव्हान देणाऱ्या जयदेव यांनी अवलंबिलेल्या कायदेशीर प्रक्रियेबाबत आणि त्याअंतर्गत त्यांना दिलासा दिला जाऊ शकतो का, असा सवाल करीत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
दरम्यान, ‘प्रोबेट’च्या कुठल्या मुद्दय़ावर युक्तिवाद ऐकायचे हे निश्चित करण्यासाठी न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २३ जून रोजी ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा