वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलांकडून सन्मानजनक वागणूक न मिळण्याची अनेक प्रकरणं आपण आपल्या आसपास देखील पाहातो. अशा अनेक मातापित्यांनी थेट न्यायालयात देखील याविरोधात दाद मागितल्याचं देखील अनेकदा दिसून येतं. मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच अशाच एका प्रकरणामध्ये निवाडा दिला असून एका वृद्ध पित्याच्या बाजूने निकाल दिला आहे. आपल्याच मुलीकडून छळ होत असल्याची याचिका या वृद्ध पित्यानं न्यायालयात दाखल केली होती. पित्याच्या फ्लॅटवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बसलेल्या मुलीला न्यायालयानं तातडीने मालमत्ता खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यावेळी न्यायालयाने मुंबईत अशी प्रकरणं वाढत असल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली.
श्रीमंत वर्गामध्ये मुलांकडून छळ होण्याचं प्रमाण जास्त
मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. “हा आमचा अनुभव आहे की या शहरात आणि विशेषत: श्रीमंत वर्गामध्ये वृद्ध मातापित्यांना त्यांच्या उतारवयामध्ये त्यांच्याच मुलांकडून त्रास आणि छळ सहन करावा लागतो”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
“आमच्यासमोर अशी अनेक प्रकरणं येत आहेत ज्यात वृद्ध माता-पित्यांना त्यांच्याच मुलांकडून छळ सहन करावा लागत आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांची संपत्ती मिळवण्याचा मुलांकडून प्रयत्न होत असल्याचं दिसून आलं आहे. शिवाय, असं करताना मुलांकडून आपल्या पालकांच्या वार्धक्यामध्ये त्यांच्या आयुष्याविषयी कोणताही विचार केला जात नाही”, असं देखील न्यायालयाने यावेळी म्हटलं.
काय होतं प्रकरण?
न्यायालयासमोर सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणात मुलगी २०१५पर्यंत जर्मनीमध्ये राहात होती. मात्र, त्यानंतर ती भारतात परतली. तिच्या वडिलांचा दक्षिण मुंबईच्या अल्टामाऊंट रोड या आलिशान भागामध्ये फ्लॅट आहे. त्या ठिकाणी ती वडिलांसोबत राहू लागली. मुलगी काही दिवस राहून परत निघून जाईल असं वडिलांना वाटलं. मात्र, ते न झाल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले. हे वाद इतके विकोपाला गेले, की त्या फ्लॅटमधील आपला हिस्सा घेतल्याशिवाय आपण परत जाणार नसल्याचं मुलीनं वडिलांनाच धमकावलं.
मुलीच्या या मागणीवर न्यायालयानं तिला सुनावलं. “वडील जिवंत असताना कसला हिस्सा? उलट वडील त्यांची पूर्ण संपत्ती दुसऱ्या कुणालातरी देऊन टाकू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. मुलगी त्यांना असं करण्यापासून रोखू शकत नाही. जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला त्यांच्या मालमत्तेमध्ये कोणताही हिस्सा मिळणार नाही”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.