‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’कडे न्यायालयाची विचारणा * कावेरी पाणी तंटय़ामुळे चेन्नईचे सामने पुण्यामध्ये खेळवण्याचा मुद्दा

कावेरी पाणी तंटय़ामुळे ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमातील चेन्नई येथे होणारे सहा सामने पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवले जाणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी देताच या सामन्यांदरम्यान मैदान आणि खेळपट्टीच्या देखभालीसाठी पुणे पालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी करणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे केली. तसेच त्याबाबत पुढील आठवडय़ात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात दृष्काळसदृश्य परिस्थिती तसेच पाणी टंचाईची समस्या असताना ‘आयपीएल’च्या सामन्यांदरम्यान खेळपट्टय़ा चांगल्या राहाव्यात यासाठी कोटय़वधी लीटर पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याची बाब २०१६ मध्ये ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संस्थेने याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत न्यायालयानेही मुंबई आणि राज्यातील आयपीएलचे सामने अन्यत्र खेळवण्याचे आदेश दिले होते. मात्र अशी परिस्थिती प्रत्येक उन्हाळ्यात असते. त्यामुळे याचिका निकाली न काढता प्रलंबित ठेवण्यात आली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली असता पुणे येथे ‘आयपीएल’चे एकूण ११ सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यात कावेरी पाणी तंटय़ामुळे चेन्नई येथे होणारे सहा सामनेही आता पुणे येथे खेळवण्यात येणार आहेत.

मात्र पुणे शहर आणि ग्रामीण आधीच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात असल्याची बाबही याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची दखल घेत पुण्यातील मैदानाच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या सामन्यांसाठी पुणे पालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी करणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच असोसिएशनला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अशीच विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी वानखेडे स्टेडिअमच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या मुंबई महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करत मैदानासाठी विशेष पाणीपुरवठा करणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाची १८ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.