मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाला फटकारलं आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका आता उद्याच घ्याव्या लागणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाची न्यायालयात धाव

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता रविवारी २२ सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय जाहीर केला होता. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक उद्याच घ्या असं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले की, जे निवडणूक लढवत आहेत त्या उमेदवारांचा आज विजय झाला आहे, सिनेटच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तसंच आमचा विजय निश्चित झालेला आहे. डरपोक CM म्हणजे नावापुढे DCM लावायला हवं, हे आता स्पष्ट झालेलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

वरुण सरदेसाई काय म्हणाले?

‘मुंबई विद्यापीठाचे सिनेट निवडणूक शुक्रवारी स्थगित करण्यात आली होती त्या संदर्भात युवासेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानू इच्छितो. कारण वेळीच त्यांनी सुनावणी घेऊन उद्याच्या उद्या निवडणूक घेण्याविषयी निर्देश दिले. हा विजय केवळ युवा सेनेचा नसून १३ हजार ५०० पदवीधरांचा विजय आहे. या सरकारने जे पदवीधरांच्या बाबतीत षडयंत्र रचल होतं ते न्यायालयाने हाणून पाडला आहे. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो. त्यासोबतच युवासेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. दहापैकी दहा जागा जिंकू’ असा विश्वास वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

याचिकाकर्ते प्रदीप सावंत काय काय म्हणाले?

“आज न्यायालयाने दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय आहे, आम्ही पूर्णपणे निवडणुकीला उद्या सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सुद्धा आमची शिवसेनेची फौज तयार आहे. आम्ही मागील वेळेस सारखे दहाच्या दहा जागांवर विजयी होऊ. रडीचा डाव विद्यापीठ आणि राज्य सरकारने खेळला पण त्याचा काही उपयोग झाला नाही कोर्टाने निर्देश दिले आहेत. आम्हाला आता काही तासात तयारी करायची आहे पण आम्हाला चिंता नाही आम्ही पूर्णपणे तयार आहोत.” असं याचिकाकर्ते प्रदीप सावंत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court slams mumbai university orders senate elections to be held tomorrow scj