जेवणात माशांऐवजी केवळ चटणी वाढली म्हणून संतापून पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
विठ्ठल वाघमारे असे या आरोपीचे नाव असून त्याला रायगड सत्र न्यायालयाने पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामानी आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठानेही सत्र न्यायालयाने वाघमारे याला सुनावलेली शिक्षा योग्य असल्याचे स्पष्ट करीत त्यावर शिक्कामोर्तब केले.
रायगड येथील ढोकळ्याची वाडी येथे विठ्ठल पत्नी भुरीबाई, मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होता. १५ ऑक्टोबर २००७ रोजी विठ्ठलने मासे आणले आणि भुरीबाईच्या हवाली केले. परंतु एकीकडे ते बनविण्याची तयारी करीत असतानाच दुसरीकडे मांजरीने ते मासे खाल्ले. त्यामुळे भुरीबाईने जेवणात विठ्ठलला चटणी वाढली. जेवणात माशांऐवजी केवळ चटणी वाढली गेल्याने त्याने जेवणास नकार दिला. तसेच संतापून भुरीबाईवर केरोसिन ओतून तिला जाळले. ही घटना घडली त्या वेळी संगीताही घरातच होती. त्यामुळे तिने लागलीच आरडाओरडा केल्याने शेजारी घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत भुरीभाईचा मृत्यू झाला होता.
न्यायालयाने या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाप्रमाणेच संगीताची साक्ष, शवविच्छेदन अहवाल ग्राह्य धरत विठ्ठलच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. संगीताही या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून अन्य दोन साक्षीदारांची साक्ष मात्र न्यायालयाने हा निर्णय देताना फेटाळून लावली.

Story img Loader