शहरामध्ये किमान वेतन हे १३,७२० रुपये असावे असा महाराष्ट्र शासनाचा कायदा असताना १६० वर्षे पूर्ण झालेल्या मुंबई विद्यापीठात जवळपास चौदाशे कर्मचारी हे गेली कित्येक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करत असून त्यांना आठ ते दहा हजार रुपयेच वेतन देण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना कामगार मानण्यास विद्यापीठ तयार नसून हे कर्मचारी वेठबिगार आहेत की गुलाम तेही स्पष्ट करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आपण या कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देऊन सेवेत कायम करावे आणि कुलगुरूंवर किमान वेतन कायदा न पाळल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
गेल्या तीन दशकांत मुंबई विद्यापीठाचा पसारा वेगाने वाढत गेला असून ज्या विद्यापीठात १९८१ मध्ये १५० महाविद्यालये होती तेथे आजघडीला ७४०हून अधिक महाविद्यालये संलग्न झाली आहेत. कलिना, ठाणे तसेच रत्नागिरी येथे विद्यापीठाची केंद्रे उभी राहिली असून नवीन अभ्यासक्रम, परीक्षार्थीच्या वाढत्या संख्येमुळे निकालाच्या कामापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही हंगामी असून मुंबईत आठ ते दहा हजार रुपयांमध्ये घर कसे चालवायचे ते तरी आम्हाला शिकवा, असे आवाहनही या कामगारांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहे. गेल्या दोन दशकांत वाढलेली महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, बसभाडय़ापासून सर्वच गोष्टींमध्ये वाढ होत असताना मुंबई विद्यापीठातच लिपिक, डाटाएन्ट्री ऑपरेटर, शिपाई व सुरक्षारक्षक अशा सुमारे चौदाशे कर्मचारी-कामगारांना वेठबिगारासारखे राबविले जात असून या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केल्यानंतरच सरकारला जाग येणार आहे का, असा सवाल ‘मुंबई विद्यापीठ कामगार संघटना’चे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी यापूर्वी न्यायालयानेही विद्यापीठाला फटकारले आहे. या हंगामी कर्मचाऱ्यांचा पीएफ, ईएसआयसी आदी काहीच भरले जात नसून शासनाने केलेल्या किमान वेतन कायद्यानुसारही त्यांना वेतन दिले जात नाही, असे तुळसकर यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनाही फटका
या प्रकाराचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. यंदा घेण्यात आलेल्या ४२६ परीक्षांपैकी २६१ परीक्षांचेच निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आले आहेत. नियमानुसार ४५ दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर करणे आवश्यक असताना केवळ ७९ परीक्षांचेच निकाल ४५ दिवसांत तर ६५ परीक्षांचे ३० दिवसांत लावण्यात विद्यापीठाला यश आले. ११७ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांनंतर जाहीर करण्यात आले असून १६५ परीक्षांचे निकाल अद्यापि जाहीर व्हायचे बाकी आहे.