मुंबई: रक्ताचा कर्करोग, एप्लास्टिक ॲनिमिया, थॅलेसिमिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. बोरिवलीमधील बोनमॅरो प्रत्यारोपण (बीएमटी) केंद्रापाठोपाठ आता शीव रुग्णालयामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयामध्ये रक्तदोषासंदर्भातील विशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर भविष्यात या केंद्रासाठी उपलब्ध होऊ शकतील.
बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने जून २०१८ पासून बोरिवली येथे बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्र (बीएमटी) सुरू केले. या केंद्रात आतापर्यंत ३०० हून अधिक बोनमॅरो प्रत्योरोपण करण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये प्रत्येक वर्षी शस्त्रक्रियांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आता ही सुविधा मुंबई महानगरपालिकांच्या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शीव रुग्णालयामध्ये हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा… दादरमधील १५ मजली इमारतीला आग; घुसमटल्यामुळे वृद्धाचा मृत्यू
मात्र हे केंद्र सुरू करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी रुग्णालयामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण संबंधित विशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रक्तदोष कर्करोगासारख्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी दोन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी एक प्राध्यापक शीव रुग्णालयाचा माजी विद्यार्थी आहे.