शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन न मिळाल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झालेले शिवसैनिक नाराज झाले असून याची दखल घेऊन बाळासाहेबांचा अस्थिकलश गावागावांमध्ये दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांचा अस्थिकलश घेतला.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तमाम शिवसैनिकांनी मुंबईत धाव घेतली होती. मात्र शिवसेनाप्रमुखांची अंत्ययात्रा मुगीच्या पावाने मार्गस्थ झाल्यामुळे शिवाजी पार्कमध्ये पोहोचण्यास बराच विलंब झाला. त्यामुळे शिवसैनिकांना बाळासाहेबांचे अंतीम दर्शन घेता आले नाही. त्यामुळे अनेक जण नाराज झाले. ही बाब विचारात घेऊन मुंबई, महाराष्ट्रासह भारतातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेबांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
शिवाजी पार्कमध्ये रविवारी सायंकाळी शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अस्थी घेतल्या. त्यावेळी त्यांच्यासोबर शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, तसेच मनसेचे आमदार शिशिर शिंदे होते. मात्र रजा ठाकरे यांनी अनुपस्थिती उपस्थित शिवसैनिकांना जाणवत होती.
गावागावांतील शिवसैनिकांच्या दर्शनासाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयांत उपलब्ध करण्यात येणाऱ्या बाळासाहेबांच्या अस्थिकलशांचे दादर येथील शिवसेना भवनात २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता वितरण करण्यात येणार आहे.
शिवसेना नेते, उपनेते, खासदार-आमदार, संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत हे अस्थिकलश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तसेच भारतातील सर्व राज्यांच्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. विविध ठिकाणच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये २१ व २२ नोव्हेंबर रोजी शिवसैनिकांच्या दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहेत. हरिहरेश्वर, नाशिक, हरिद्वार, काशी, कन्याकुमारी आदी ठिकाणी २३ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा