मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी काही मिनिटे अवधी असताना मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांच्यातील चर्चेअंती महापालिका प्रशासनाने बोनसची घोषणा केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट २९ हजार रुपये बोनस जाहीर झाला आहे. मुंबई महापालिकेत एक लाखहून अधिक कर्मचारी कार्यरत असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस जाहीर करावा, अशी मागणी पालिकेतील विविध कामगार संघटनांनी गेल्या महिन्यातच पालिका आयुक्तांकडे केली होती. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी, शिक्षक यांना सरसकट २६ हजार रुपये बोनस जाहीर केला होता. तसेच, आरोग्य सेविकांना ११ हजार रुपये दिवाळी भेट जाहीर करण्यात आली होती. यंदा बोनसमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – मुंबई : मोनो रेलच्या महसूल वृद्धीसाठी जाहिरातींचा आधार
महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका प्राथमिक शाळेतील, तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित / विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित / विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) अशा सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट २९ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तर सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (सीएचव्ही) भाऊबीज भेट रुपये म्हणून १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत. बालवाडी शिक्षिका / मदतनीस यांना पाच हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.
तिजोरीवर अडीचशे कोटींचा भार
महापालिकेचे कर्मचारी गेला महिनाभर बोनससाठी पाठपुरावा करीत होते. मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नव्हता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बोनस दरवर्षी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जाहीर करत असतो. मात्र पालिका सभागृह विसर्जित झाल्यामुळे गेली दोन वर्षे मुख्यमंत्री बोनसची घोषणा करीत आहेत. पूर्वी बोनसच्या रकमेत दरवर्षी जेमतेम पाचशे रुपये वाढ होत होती. गेल्यावर्षी एकदम साडेतीन हजार रुपये वाढविण्यात आले होते. तर यंदा बोनस तीन हजार रुपयांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे २५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मात्र पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सानुग्रह अनुदानासाठी पुरेशी तरतूद असल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नव्या पर्वास लवकरच प्रारंभ…
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईत निर्णय
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्यापूर्वी पालिकेतील विविध कामगार संघटनांनी मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धाव घेतली होती. मात्र मुख्यमंत्री ठाण्यात असल्यामुळे अखेर दूरध्वनीवरून आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली व त्यानंतर दुपारी ३.१५ वाजता बोनसची घोषणा करण्यात आली. यावेळी वर्षा निवासस्थानी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र शिवसेना (ठाकरे) प्रणित कामगार सेनेचे प्रतिनिधी अनुपस्थित होते.