ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी उपक्रम
बिस्कटचा पुडा घेण्यासाठी लागणाऱ्या पैशात पुस्तके उपलब्ध झाली तर.. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत वाचन संस्कृती पोहचेल. नेमका हाच विचार करुन कोल्हापुरातील एका प्रकाशकाने ‘खाऊच्या पैशांत पुस्तके’ ही संकल्पना घेऊन अवघ्या सात ते आठ रुपयांपासून साहित्यापासून विज्ञानासारख्या विषयांना गवसणी घालणारी पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत.
बालसाहित्य व बालशिक्षण यांना वाहिलेले ‘मासिक ॠग्वेद’ बालक, पालक व शिक्षक यांच्यातील दुवा म्हणून गेली सतरा वर्षे चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी आदी बारा तालुक्यांमध्ये कार्यरत आहे. दुर्गम भागातील शाळांना दत्तक घेऊन तेथील मुलांना अभ्यास साहित्य पुरवण्याबरोबरच त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी विविध प्रयोग सातत्याने केले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून मासिकाची तपपूर्ती झाली तेव्हा ‘मासिक ॠग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड’ च्या माध्यमातून सुमारे तीन लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला. या निधीतून ग्रामीण भागातील लहान मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व उत्तमोत्तम बालसाहित्य त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी अल्प किंमतीत पुस्तके प्रकाशित करण्याचा अनोखा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवला जात आहे. या उपक्रमाचे घोषवाक्यच ‘खाऊच्या पैशांमध्ये पुस्तक’ असे असल्याने अवघ्या दहा रुपयांमध्ये मुलांना उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. आकलनास सुलभ असणारी पुस्तके अल्प किंमतीत प्रकाशित करण्यात आल्याने लहान मुलेही उत्स्फुर्तपणे पुस्तके खरेदी करत आहेत. ‘एक होता पक्षीमित्र प्राणीसखा’, ‘गिजुभाईंच्या अनुभवातून’, ‘राया’, ‘जपानहून आणलेल्या छोटय़ांच्या मोठय़ा गोष्टी’ ‘बसराची ग्रंथपाल’ आदी अनेक स्वतंत्र व अनुवादित बालसाहित्याच्या पुस्तकांचा समावेश असल्याचे मासिक ऋग्वेदचे सुभाष विभुते यांनी सांगितले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा