Black Marketing of Coldplay Ticket on Book My Show : कोल्ड प्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईत त्यांचा कार्यक्रम सादर करणार आहे. “म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५” असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर काही मिनिटात सर्व तिकीटं विकली गेली. या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल ३ लाखांपर्यंतची रक्कम मोजली. त्यामुळे बुक माय शोवरून तिकिटांचा काळाबाजार झाल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणी बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमराजानी यांना मुंबई पोलिसांनी दोनदा समन्स पाठवलं. परंतु, दोन्ही समन्सकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने बुक माय शोची मूळ कंपनी असलेल्या बीग ट्री एन्टटेंन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमराजानी आणि तांत्रित प्रमुख यांना नोटीस बजावली होती. या नोटीसीद्वारे आज त्यांना मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, त्यांच्याऐवजी सीओ अनिल मखिजा हे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. हेमराजानी अद्यापही चौकशीसाठी आलेले नाहीत.

हेही वाचा >> Coldplay Ticket : “तिकिटांचा काळा बाजार…”, कोल्ड प्ले तिकिट विक्रीवरून बुक माय शोवर टीका झाल्यानंतर कंपनीने दिलं स्पष्टीकरण!

बुक माय शोच्या निवेदनात काय म्हटलं होतं?

गेल्या आठवड्यात बुक माय शोने एक निवेदन सादर केलं होतं. “BookMyShow चा कोणत्याही अनधिकृत तिकीट विक्री/पुनर्विक्रीच्या प्लॅटफॉर्मशी कोणताही संबंध नाही. भारतात तिकिटांचा काळा बाजार करणे अनधिकृत आहे. आम्हीही काळा बाजार प्रथेला विरोध करतो. याविरोधात आम्ही तक्रारही केली आहे. आम्ही केवळ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नाही तर या प्रकरणातील तपासाला सहकार्य करत आहोत. आमच्या ग्राहकांना, आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की त्यांनी इतर कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावर तिकिटे बुक केली असती तर ती बनावट किंवा अवैध असू शकतील”, असं बुक माय शो ने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

‘कोल्डप्ले’ काय आहे? या कंपूत कोण कोण कलाकार आहेत?

‘कोल्डप्ले’ हा ब्रिटिश वाद्यवृंद कंपू आहे. गायक आणि पियानोवादक ख्रिस मार्टिन, गिटार आणि कीबोर्डवादक जॉनी बुकलँड, बास गिटारिस्ट गाय बेरिमन, ड्रम्स आणि तालवाद्य वादक विल चॅम्पियन आणि व्यवस्थापक फिल हार्वे हे या कंपूचे प्रमुख सभासद. या कंपूच्या संगीतप्रवासाला सुरुवात झाली, १९९७ मध्ये. त्याआधी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे ख्रिस आणि जॉनी या दोघांनी १९९६ या वर्षात काही काळ एकत्र काम केले होते. पुढच्या वर्षी गाय बेरिमन त्यांच्या कंपूत सहभागी झाला. गाणी तयार करून त्याचा अखंड सराव करायचा आणि मग ती ध्वनिमुद्रित करायची, असा त्यांचा शिरस्ता. पण, या कंपूचा कायमस्वरूपी भाग होऊ शकेल, असा ड्रमर त्यांना गवसत नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या ड्रमरवर अवलंबून राहावे लागत असे. हा प्रश्न सोडवला विल चॅम्पियनने. या चौघांची योगायोगाने झालेली भेट नंतर दीर्घ काळची सोबत झाली. फिल हार्वे आधी व्यवस्थापक म्हणून, नंतर बराच काळ सर्जनात्मक दिग्दर्शक म्हणून आणि पुन्हा व्यवस्थापक म्हणून कंपूसोबत आहे.

Story img Loader