मुंबई : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल केल्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आलेला आंतरराष्ट्रीय बुकी अनिल जयसिंघानी याला याआधी ठाणे व मुंबई पोलिसांनी अटक केली होती. परंतु अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जयसिंघानी याला तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभय दिल्याची बाब समोर आली आहे. ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या जयसिंघानीच्या संरक्षणासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आपले अधिकारी पाठविले होते. ही बाब गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन सहआयुक्तांच्या शेऱ्यामुळे स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा… “७२ तास चकवा दिल्यानंतर कशी झाली अनिल जयसिंघानीला अटक?” मुंबई पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

जयसिंघानी याला ठाणे पोलिसांतील गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपायुक्त अमर जाधव यांनी २००४मध्ये अटक केली होती. त्यावेळीही जाधव यांच्यावर आरोप केले होते. पुढे जाधव यांनीच २००९मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागात उपायुक्त असतानाही त्याला अटक केली. त्यावेळीही जयसिंघानी याने जाधव यांच्यावर जोरदार आरोप केले. या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त के एम प्रसन्ना यांनी रीतसर चौकशी केली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. अमर जाधव यांनी कारवाई करू नये यासाठीच खोटे आरोप केले गेल्याचे प्रसन्ना यांनी चौकशीअंती निष्कर्ष काढला आहे. या काळात ठाणे पोलीस तसेच मुंबई पोलिसांनी जयसिंघानी याला संरक्षण दिले होते. इतकेच नव्हे तर ठाणे पोलिसांनी जयसिंघानी यांच्या पत्नीला रिव्हॉल्व्हरचा परवानाही मंजूर केला होता. जयसिंघानी याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी तत्कालीन वरिष्ठ अधिकारी जोरदार प्रयत्न करीत होते. आतापर्यंत जयसिंघानीला या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभय मिळाले आहे. आता थेट गृहमंत्र्यांच्या पत्नीलाच ब्लॅकमेल करण्यापर्यंत त्याची मजल केली. पण हे प्रकरण महागात पडू लागले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फरार राहू शकलेला जयसिंघानी मुंबई पोलिसांना सापडला आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : माजी गृहमंत्री अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, २३ मार्चपर्यंत ईडी कारवाई नाही

अमर जाधव यांच्याविरोधात खोटे आरोप करणाऱ्या जयसिंघानी याने जाधव यांच्या पत्नीलाही धमक्यांचे संदेश पाठविले होते. ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे जाधव यांनी रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु त्यावेळी ठाणे पोलिसांनी `हे तुमचे वैयक्तिक भांडण असल्याʼचे कारण दाखवत जयसिंघानी याच्याविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला. एका पोलीस उपायुक्तालाही दाद न देणाऱ्या ठाणे पोलिसांनी जयसिंघानी याला संरक्षण देताना, ठाण्यातील गुन्हे असलेल्या व्यक्तींना याआधीही संरक्षण पुरविले असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते.

Story img Loader