डोंगरी, हॉटेल्स, मॉल, मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती
अनिश पाटील, लोकसत्ता
सध्या बॉम्बस्फोट अथवा दहशतवादी हल्लांची खोटी माहिती देण्याचे पेव फुटले असून अशाच प्रकारे खोटी माहिती देणाऱ्या एका सराईत आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षातून आरडीएक्स घेऊन दोन व्यक्ती आल्या असून ते डोंगरी परिसरात बॉम्बस्फोट घडविण्याबाबत चर्चा करीत असल्याची खोटी माहिती आरोपीने दारूच्या नशेत मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दिली होती. गंभीर बाब म्हणजे आरोपीने यापूर्वीही दारूच्या नशेत अनेक वेळा पोलिसांना दूरध्वनी करून खोटी माहिती दिली आहे. त्याच्याविरोधात बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा >>> नालेसफाईसाठी यंदा २२६ कोटी रुपये खर्च ; आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद
पोलिसांनी सूरज धर्मा जाधव याला अटक केली असून तो बोरिवलीमधील एक्सर परिसरातील रहिवासी आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० ते ७.०० च्या दरम्यान मुख्य नियंत्रण कक्षात दोन दूरध्वनी आले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने एका विशिष्ट धर्माच्या दोन व्यक्ती रिक्षातून आरडीएक्स घेऊन आल्या असून ते डोंगरी परिसर उडवणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली. पण घटनास्थळी असे काहीच सापडले नाही. अखेर पोलिसांनी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकाची माहिती घेतली असता तो जाधवने केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला असून जाधवने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याने अनेक वेळा पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून बॉम्बस्फोटांबाबतची खोटी माहिती दिली आहे. यापूर्वी वाकोला पोलिसांनीही त्याला अटक केली होती. त्याने दिवाळीच्या मुहूर्तावर मॉल आणि हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. गेल्यावर्षी १८ ऑक्टोबर रोजी त्याने हेल्पलाइन क्रमांक ११२ वर दूरध्वनी करून मुंबईतील ग्रँड हयात, पीव्हीआर सिनेमा मॉल, इन्फिनिटी मॉल आणि सहारा स्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटांबाबत खोटी माहिती दिली होती. त्यापूर्वी त्याने मुंबई विद्यापीठ उडवण्याचीही धमकी दिली होती. त्याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाधवविरोधात बोरिवली व वाकोला पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, तसेच बीकेसी व खेरवाडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्यात बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यासह हत्येचा प्रयत्न व चोरीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.