मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या देखभालीचा खर्च भागवण्याच्या हेतूने वन्यप्राणी दत्तक योजना राबवण्यात येते. अनेक नामवंतांसह सर्वसामान्य प्राणीप्रेमींनी सहभाग दर्शवलेल्या या योजनेत प्राण्यांचे पालकत्व घ्यायला पुढे येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी सद्यस्थितीत उद्यानातील २ वाघ आणि १ बिबट अजूनही पालकांच्या प्रतिक्षेतच आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद असणाऱ्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी २०१४ मध्ये प्रशासनातर्फे वन्यजीव दत्तक योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत सफारी, बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) आणि दर्शन पिंजऱ्यांमध्ये असलेल्या वाघ, बिबट, सिंह, वाघाटी आणि नीलगाय या प्राण्यांना दत्तक घेण्याचे आवाहन प्रशासन करते. या योजनेनुसार वाघ ३ लाख १० हजार, सिंह ३ लाख, बिबट्या १ लाख २० हजार, वाघाटी ५० हजार, नीलगाय ३० हजार आणि हरिण २० हजार रुपये भरून वर्षभरासाठी दत्तक घेता येते. वर्षभर प्राण्यांचा आहार व उपचाराचा खर्च दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. दरम्यान, सध्या उद्यानातील ८ वाघ, २० बिबट, २ सिंह, २ वाघाटी आणि १ नीलगाय यांचे पालकत्व स्विकारण्यात आलेले आहे. तर, २ वाघ आणि १ बिबट अजूनही पालकांच्या प्रतिक्षेत आहेत. यापूर्वी मंत्री रामदास आठवले यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला बिबट्या दत्तक घेतला होता. तसेच सामाजिक कार्यकर्त्या साधना वझे यांनी अनेक वर्ष बिबट्याला दत्तक घेतले आहे. याचबरोबर प्रताप सरनाईक, अभिनेता सुमित राघवन यांनीही प्राणी दत्तक घेतले आहेत. तसेच, २०२१ मध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचाही दत्तक योजनेत सहभाग होता. दरम्यान, दत्तक करार संपुष्टात आल्यानंतर त्याच्या नूतनीकरणाचा विचार करत नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा :ठाकरे बंधू खेळामध्ये रमले; प्रचारादरम्यान तरुणाईमध्ये मिसळले, क्रिकेट आणि फुटबॉल खेळत क्षणभर विरंगुळा

वन्य प्राण्यांच्या आहार, उपचारांवरील खर्चासाठी तसेच मानवी साखळीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वन्य प्राण्याविषयी शहरवासीयांची जवळीक वाढावी या उद्देशाने दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या प्रजाती एक वर्षांच्या करारावर दत्तक घेता येतात. वर्षभर प्राण्यांचा आहार व उपचाराचा खर्च दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. तसेच एखादा वन्यप्राणी दत्तक घेतल्यास त्या व्यक्तीला त्याचे पालकत्व स्विकारल्याचे प्रमाणपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे देण्यात येते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्याजवळ लावला जातो. तसेच, आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते.

कोणते प्राणी दत्तक घेता येतात

या योजनेअंतर्गत सिंह, वाघ, वाघाटी, बिबट्या, नीलगाय, भेकर, सांबर आणि चितळ या वन्यजीवांना दत्तक घेता येते.

हेही वाचा :प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल

दत्तक घेण्यासाठी खर्च

या योजनेनुसार वाघ ३ लाख १० हजार रुपये, सिंह ३ लाख रुपये, बिबट्या १ लाख २० हजार रुपये, वाघाटी ५० हजार रुपये, नीलगाय ३० हजार रुपये आणि हरिण २० हजार रुपये भरून वर्षभरासाठी दत्तक घेता येतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Borivali sanjay gandhi national park two tigers one leopard awaiting for adoption under wild animal adoption scheme mumbai print news css