कांदिवलीच्या लालजीपाडा येथून गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या गणेश पाथोर या तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नाल्यात सापडला. खेळताखेळता नाल्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लालजीपाडय़ातील गांधीनगरच्या सुरेंद्र चाळीत विनोद पाथोरे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या चार मुलांपैकीसगळ्यात धाकटा गणेश १४ नोव्हेंबरला घराजवळच खेळत होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी पोईसर नाल्याजवळ काही जणांना चिखलात गणेशचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर जखम होती तर डाव्या डोळ्याला इजा झालेली होती. परंतु यामागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. त्याचे अपहरण झाले नसावे कारण खंडणीसाठी कुणी फोन केला नव्हता. त्यामुळे तो खेळता खेळता नाल्यात पडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी अधिक प्रकाश पडू शकेल, असे बांगूर नगर पोलिसांनी सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा