मानखुर्द बालसुधारगृहातील खिडकीचे लोखंडी गज वाकवून १७ वर्षीय मुलाने पलायन केल्याची घटना शनिवारी घडली. मात्र शिवाजी नगर पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या तीन तासांमध्ये या मुलाला पकडले आणि त्याची रवानगी पुन्हा सुधारगृहात केली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश येथील एका गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली होती.

मात्र या मुलाने मध्य प्रदेश येथून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. त्यानंतर त्याने थेट मुंबई गाठली. गोवंडी परिसरात हा मुलगा फिरत असताना शिवाजी नगर पोलिसांनी त्याला हटकले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मानखुर्द बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते.
मात्र शनिवारी सायंकाळी या मुलाने बालसुधारगृहातील खिडकीचे गज वाकवून पलायन केले. सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

पोलिसांनी तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर टर्मिनस परिसरात या मुलाचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर पोलिसांनी बालसुधारगृह आणि आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासले असता तो गोवंडीतच असल्याचे उघड झाले. अखेर पोलिसांनी त्याला गोवंडीतील बैंगनवाडी परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.

Story img Loader