यंदा तिकीट खिडकीवर लक्षणीय यश मिळवण्याचा मराठी चित्रपटांचा सिलसिला अजूनही सुरू असून याची प्रचिती ‘बॉईज ३’ या मराठी चित्रपटाने दिली. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याझाल्या पहिल्याच आठवड्यात ४.९६ कोटी रुपयांची कमाई केली.एकीकडे बॉलिवूडचे मोठे चित्रपट यश मिळण्यासाठी धडपडत असताना काही मराठी चित्रपटांना प्रेक्षकानी चांगला प्रतिसाद दिला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह प्रसिध्द गायक संगीतकार अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ३’ चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांनाही तिकीट खिडकीवर चांगले यश मिळाले होते. या चित्रपटातील ‘धैर्या’, ‘ढुंग्या’ आणि ‘कबीर’ हे त्रिकुट तरुणाईत आधीच लोकप्रिय झाले होते. पुन्हा एकदा त्यांच्या गोष्टीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये ‘बॉईज ३’च्या शोची संख्या वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा >>> Dussehra Melava: उद्धव ठाकरे उभे राहतील तेव्हाच एकनाथ शिंदेही भाषण करणार? शिंदे गट म्हणतो “भाषणाची वेळ…”
‘आपला चित्रपट हिट होताना पाहणे हेच प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असते. त्यात भर म्हणजे ‘बॉईज ३’चे राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे सगळे शो हाऊसफूल सुरू आहेत. याचा विशेष आनंद आहे. मराठीत कदाचित असे पहिल्यांदाच झाले असेल की ‘बॉईज’ या चित्रपटाचे तीनही भाग हिट झाले आहेत. या चित्रपटासाठी कलाकार, निर्माते, संगीतकार सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचेच हे फळ आहे’, अशी भावना ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> मुंबई : रेल्वे स्थानकांतील महिलांच्या विनयभंगाच्या घटनांची रेल्वेला डोकेदुखी
यावर्षीचे यशस्वी मराठी चित्रपट
यावर्षी ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने ३० कोटी रुपयांहून अधिक दणदणीत कमाई केली. पाठोपाठ ‘धर्मवीर’ चित्रपटाने २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने १७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. तर ‘शेर शिवराज’, ‘टाईमपास ३’, ‘लोच्या झाला रे’ या तीन चित्रपटांनी ५ ते १० कोटींच्या घरात कमाई केली आहे. ‘बॉईज ३’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपटही हिट चित्रपटांच्या यादीत प्रवेश करेल, असा विश्वास निर्माते, दिग्दर्शक यांनी व्यक्त केला आहे.