आपल्याला झालेला आजार बरा होणारा नाही, या एकाच नैराश्याने ग्रासलेल्या एका रुग्णाने बॉम्बे रुग्णालयात सोमवारी सकाळी धुडगूस घालत प्रचंड तोडफोड केली. त्याने लोखंडी सळईने केलेल्या मारहाणीत एका रुग्णाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जबर जखमी झाले. नैराश्यग्रस्त रुग्णाला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर तेथे मानसोपचारतज्ज्ञ उपचार करत आहेत.
आग्रीपाडा येथील रहिवासी असलेला शहाबुद्दिन मोहबली तालुकदार (४२) हा रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, आपल्याला झालेला आजार दुर्धर आणि उपचारापलीकडचा आहे या नैराश्याने त्याला ग्रासले होते. या नैराश्याच्या झटक्यातूनच सोमवारी सकाळी त्याने हिंसक रूप धारण केले. रुग्णालयातील साधारण विभागात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास त्याने धुमाकूळ घातला व इतर रुग्णांवर सलाइनच्या लोखंडी सळईने हल्ला चढवला. प्रथमत त्याने रुग्णालयातील काचा फोडण्यास सुरुवात केली. नंतर याच विभागात उपचार घेत असलेल्या लिलाबिहारी ठाकूर (६५), एकनाथ अरटे (६६) आणि प्रभुलचंद परमार (७०) या तीन रुग्णांना बेदम मारले. त्यात ठाकूर यांचा मृत्यू झाला तर अरटे आणि परमार यांची प्रकृती गंभीर आहे. हिंसक झालेला शहाबुद्दिन साधारण विभागातून पुढच्या विभागात गेला.
तेथेही तो रुग्णांना मारहाण करणार तेवढय़ात रुग्णांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्याला आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. शहाबद्दिनविरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शहाबुद्दिनला नंतर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.