न्यू इंडिया को-ऑप. बँक १२२ कोटी अपहाराप्रकरणी महत्त्वाची माहिती
मुंबई : ‘न्यू इंडिया को-ऑप. बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग चाचणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून या अहवालातून मेहतासह माजी अध्यक्ष हिरेन भानू व इतर आरोपींचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२२ कोटींच्या अपहाराप्रकरणी मेहता मुख्य आरोपी असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे गुन्हे शाखेने त्याच्या पॉलिग्राफी चाचणीचा निर्णय घेतला होता. पण मेहताच्या पॉलिग्राफी चाचणीत एवढी माहिती मिळू शकली नव्हती. त्यानंतर २८ मार्चला मेहतावर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली होती.
कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत मेहतावर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली होती. तीन तास ही चाचणी चालली होती. त्याचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाला असून हा अहवाल होकारार्थी असून याप्रकरणातील मेहतासह इतर आरोपींचाही या अपहारात सहभाग असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यात बँकेचे माजी अध्यक्ष हिरेश भानू, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, व्यावसायिक अरूणाचलम उन्ननाथन, बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू भोअल यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा अहवालातून स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी मेहताची ११ मार्चला सुमारे अडीच तास पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून आरोपीने चौकशीत खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलीस मेहताने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत. मेहता याने इतर आरोपींसह कट रचून प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पण मेहता याबाबत कोणतेही सहकार्य करत नव्हता. अखेर याप्रकरणी मेहताची ब्रेनमॅपिंग चाचणी करण्याचा निर्णय आर्थिक गुन्हे शाखेने घेतला होता.
दोन आरोपी परदेशात
बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली.
याशिवाय या प्रकरणात बँकेचा तत्कालीन सीईओ अभिमन्यू भोअन याला अटक करण्यात आली. नुकतीच याप्रकरणी चौथा आरोपी मनोहर अरूणाचलम, कपिल देढिया व उन्ननाथन अरूणाचलम यांना अटक करण्यात आली. याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू ते सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.