करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतरही मनसेकडून मुंबईसह ठाण्यात विविध ठिकाणी हंड्या फोडण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

“काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. करोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट करोना वाटप. याला विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही आहे. जगामध्ये आज ज्या काही गोष्टी मानल्या गेल्या आहेत की मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात हे नमूद केलं आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण करोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी करोनाविरुद्ध आंदोलन करा,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जनतेला घाबरवण्यासाठी करोनाची लाट आणली जात आहे; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

“हा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल त्यादिवशी….,” ठाण्यात सहायक आयुक्तांवर झालेल्या हल्लानंतर राज ठाकरे संतापले

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती झाली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असं सांगितलं होतं,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.