ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी विकसित केलेला मुरबाड झिनी आणि वाडा कोलम हा उत्तम दर्जाचा तांदूळ ग्राहकांना वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी तांदूळ महोत्सवाच्या निमित्ताने शहरातच बाजार उभा केला आहे.
ठाण्यातील शिवाई नगरातील उन्नती गार्डनच्या मैदानामध्ये भरलेल्या तांदूळ महोत्सवामुळे जिल्ह्य़ात पिकणाऱ्या १२ हून अधिक प्रतीतील उत्कृष्ट दर्जाचा सुमारे ११ हजार क्विंटल तांदूळ रास्त दरात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे किरकोळ खरेदीदारांबरोबरच घाऊक व्यापाऱ्यांनीही या महोत्सवास भेटी देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या या महोत्सवाचा रविवारी अखेरचा दिवस असून ठाणे, कल्याण, डोंबिवलीबरोबरीनेच मुलुंड आणि मुंबईतूनही या महोत्सवात ग्राहक येत असल्याची माहिती ठाणे कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील तांदूळ उत्पादनात प्रतिवर्षी वाढ होत असताना दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वितरण साखळीमुळे शेतकऱ्यांना कमी दराने, तर ग्राहकांना महाग दराने तांदूळ विकत घ्यावे लागत. जिल्ह्य़ातील गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या वाणामध्ये भेसळ करून कमी दर्जाचा माल वाडा कोलम आणि मुरबाड झिनी नावाने ग्राहकांच्या माथी मारला जात होता. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने शहरामध्येच तांदूळ महोत्सवाचे आयोजन करत थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. उन्नती गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या ६० स्टॉल्समध्ये ८००हून अधिक गटांकडून धान्यविक्री केली जात असून, त्यामुळे आठ हजारांहून अधिक कुटुंबांना व्यवसायाची संधी मिळाली आहे, अशी माहिती पालघरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. प्रकाश पवार यांनी दिली.
उपलब्ध तांदूळ..
ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील मुख्य उत्पादन असलेल्या तांदळामध्ये जया, रत्ना, कर्जत, एमटीयू, एचएमटी, वाडा कोलम, मुरबाड झिनी, गुजराथ ११ या वाणांचा समावेश आहे. याबरोबरच सोनम, जिरा, मसुरी, राशी, रुपाली, कुडई, दप्तरी, रूबी असे वाणसुद्धा या महोत्सवात पाहायला मिळत आहेत. याशिवाय नागली, वरई, कडवे वाल, तूर, हळद, मिरची, उडीद, मूग, पांढरा कांदा, सेंद्रिय तूप, चिकू, भाजीपाला आणि महिला बचतगटांनी तयार केलेले पदार्थ या महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
तांदळाचे वाण व किंमती
* रुपाली (वाडा कोलम) -४५ रु.
* गुजरात -४० रु.
* सुपर कोलम -६० रु. ’
* वाडा झिनी -५५ रु. ’
* वाडा सुरती कोलम -६५रु.