मुंबई : यंदाच्या २६ जुलै रोजी कारगिल युद्धात पाकिस्तान विरोधात भारताने संपादन केलेल्या विजयाला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने या युद्धात सहभागी झालेल्या व शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी यंदा भारतीय लष्कराने एक आगळीवेगळी मोहीम आखली. या मोहिमेअंतर्गत भारताच्या तीन दिशांहून निघालेल्या लष्कराच्या संघांनी मोटरसायकलीने कारगीलच्या दिशेने कूच केले. आपापल्या मार्गातील कारगील युद्धातत मोलाची कामगिरी बजावलेल्या वीर जवानांना व शहीद कुटुंबांना भेट देत, तसेच युवावर्गाला लष्कराची कार्याची माहिती देत हे साहसवीर रायडर्स अलीकडेच द्रासला पोहोचले. नॉर्दन कमांडचे कमांडर इन चीफ लेफ्ट. जनरल व्ही. सुचिन्द्र कुमार यांनी द्रास येथील कारगील वॉर मेमोरियल येथे आयोजित समारंभात भलामोठा पल्ला पार करीत द्रासला पोहोचलेल्या या वीरांचे स्वागत केले.
१९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्ताने १२ जूनला सुरू झालेल्या भारतीय लष्कराच्या या मोहिमेअंतर्गत देशाच्या तीन कोपऱ्यांतून प्रत्येकी आठ मोटारसायकल स्वारांच्या तीन संघांनी कारगीलच्या दिशेने प्रयाण केले. यांत पूर्वेकडून आसामच्या दिब्रूगढमधील दिन्जन येथून, पश्चिमेकडील द्वारका येथून आणि दक्षिणेकडून धनुषकोडीपासून ही ऐतिहासिक मोहीम सुरू झाली.
दिल्लीपर्यंत- पूर्वेकडील संघाने- दिन्जन ते दिल्ली असा- जोरहाट, गुवाहाटी, बिनागुरी, कटिहार, दानापूर, गोरखपूर, लखनौ आणि आग्रा मार्गे सुमारे २४८९ किलोमीटरचा प्रवास केला. पश्चिमेच्या संघाने- ध्रांगध्रा मार्गे द्वारका ते दिल्ली, अहमदाबाद, उदयपूर, जोधपूर, अजमेर, जयपूर आणि अल्वार असा सुमारे १,५६५ किलोमीटरचा प्रवास केला आणि दक्षिणेच्या टीमने धनुषकोडीपासून दिल्लीच्या दिशेने- मदुराई, कोईम्बतूर, बंगळुरू, अनंतपूर, हैदराबाद, नागपूर, भोपाळ ग्वाल्हेर आणि अल्वार असा सुमारे २,९६३ किलोमीटरचा पल्ला गाठला. सर्व दिशांनी आलेले संघ दिल्लीत एकत्र आले आणि त्यात उत्तरेचा संघ सहभागी झाला. २७ जून रोजी माजी लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरियलहून या संघांनी दोन वेगवेगळे मार्ग अनुसरत द्रासच्या दिशेने कूच केले. यातील एका टीमने अंबाला, अमृतसर, जम्मू, उदमपूर आणि श्रीनगर मार्गे १,०८५ किमी अंतर पार केले तर दुसऱ्या टीमने चंडीमंदिर, मनाली, सर्चू, न्योमा, तांगत्से आणि लेह मार्गे १,५०९ किमी अंतर पूर्ण केले. १० जुलै रोजी या दोन्ही टीम्स द्रासला पोहोचल्या.
या मोहिमेचे नेतृत्व लष्कराच्या तोफखानाच्या रेजिमेंटकडून केले गेले, ज्या रेजिमेन्टने ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी होण्याकरता महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतीय लष्कराच्या या ‘डेल्टा- फाइव्ह मोटारसायकल मोहिमे’चे मुख्य समन्वयक लेफ्ट. कर्नल मनोज नायर यांनी माहिती दिली की, ही मोहीम म्हणजे केवळ श्रद्धांजली नव्हती, तर भारतीय लष्कराच्या देशभक्ती, शौर्य आणि त्यागाच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक आहे. या मोहिमेचा शेवट द्रास येथील गन हिल येथे झाला. या मोहिमेचा हा अखेरचा टप्पा केवळ शौर्याचाच नाही, तर आपल्या सैनिकांच्या अविचल सामर्थ्याचा, चिकाटीचा आणि समर्पणाचा माग काढणारा होता, असे लेफ्ट. कर्नल मनोज नायर म्हणाले.
आणखी वाचा-Mumbai Rain Update : रस्ते वाहतूक कोलमडली
भारतीय लष्कराच्या साहसाचे प्रतीक असलेल्या या रायडर्सनी वेगवेगळ्या प्रांतातील आव्हानात्मक मार्गावरून प्रवास केला. मार्गक्रमणादरम्यान हे संघ कारगील युद्धातील वीर, ज्येष्ठ अधिकारी आणि शहीदांच्या कुटुंबांना आवर्जून भेटले. मार्गावरील युद्ध स्मारकांना भेट देत त्यांनी आदरांजली अर्पण केली, तसेच युवावर्गाला सैन्य दलांमध्ये दाखल होण्याकरता युवावर्गाला मार्गदर्शनही केले. या प्रवासादरम्यान प्रमुख ठिकाणी त्यांचे ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या आणि प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले, त्यावेळी या वीर मोटारसायकलस्वारांचा सन्मानही केला गेला.
हिरो मोटोकॉर्पच्या मॅवेरिक आणि एक्स पल्स बाइकवर लष्कराच्या धाडसी रायडर्सनी ही मोहीम फत्ते केली. ‘एचपीसीएल’कडून संपूर्ण मोहिमेकरता इंधन तर अपोलो रूग्णालयातर्फे वैद्यकीय साह्य उपलब्ध करून देण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे.