* नाटकाच्या जाहिरातीत जाहीर केली सूट
* नाटय़परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आक्षेप
अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असून आता दोन पॅनलमधील उमेदवारांनी एकमेकांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ‘एका क्षणात’ आणि ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकांचे निर्माते उदय धुरत यांनी आपल्या दोन्ही नाटकांच्या जाहिरातींत ‘नाटय़परिषदेच्या सदस्यांसाठी तिकिटात ५० टक्के सूट’ असे वाक्य टाकले. धुरत स्वत: नाटय़परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार असल्याने विरोधी पक्षाच्या पॅनलने या जाहिरातीवर आक्षेप घेत, हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा केला. मात्र, ही घटना केवळ अनावधानाने घडली असून आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत, असा खुलासा धुरत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
अ. भा. मराठी नाटय़परिषदेच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मोहन जोशी आणि विद्यमान उपाध्यक्ष विनय आपटे या दोन महत्त्वाकांक्षी उमेदवारांची पॅनल्स एकमेकांच्या विरोधात उभी आहेत. २० फेब्रुवारी रोजी नाटय़परिषदेच्या नव्या नियामक मंडळाची घोषणा होणार असून या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या दोन्ही पॅनल्समधील उमेदवारांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याची संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातच बुधवारी एका वर्तमानपत्रात उदय धुरत यांच्या ‘एका क्षणात’ या नाटकाची जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत धुरत यांनी ‘नाटय़परिषदेच्या सदस्यांसाठी तिकिटात ५० टक्के सूट’ घोषित केली आहे.
आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे कोणतीही घोषणा करणे हा आचारसंहिता भंग आहे, असा आक्षेप मोहन जोशी यांच्या पॅनलमधील एका उमेदवाराने घेतला. मात्र ही जाहिरात आपण खूप आधीच प्रसिद्धीसाठी दिली होती, असा दावा करत उदय धुरत यांनी आचारसंहितेचा भंग झाला असला, तरी तो अनावधानाने झाल्याचे म्हटले आहे.
चूक झालीच !
ही जाहिरात मी सर्वच वर्तमानपत्रांना दिली होती. आचारसंहितेचा भंग होण्यासारखा मजकूर या जाहिरातीत आहे, हे लक्षात येताच मी ती जाहिरात मागे घेण्याचा प्रयत्नही केला होता. इतर सर्वच वर्तमानपत्रांतून ही जाहिरात मागे घेता आली. मात्र प्रस्तुत वर्तमानपत्राने तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात मागे घेणे शक्य नसल्याचे सांगितले. आचारसंहितेचा भंग करणे हा माझा हेतू नव्हता. अनावधानाने ही चूक झाली. – उदय धुरत