आजच्या काळातही ‘द्रौपदीं’चे वस्त्रहरण होत असताना लोकसभेत बसणाऱ्या मंडळींपासून ते समाजातील सर्वसामान्यांपर्यंत सर्व जण माना खाली घालून आणि मौन धारण करून बसले आहेत. महाभारतात द्रौपदीची विटंबना थांबविण्यासाठी श्रीकृष्ण धावून आले होते. मात्र आताही भगवान श्रीकृष्ण धावून येतील, याची वाट न पाहता ही विटंबना रोखण्यासाठी मौन सोडून कृती करा, असे आवाहन माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गुरुवारी येथे केले.
जमनालाल बजाज फाऊंडेशनतर्फे नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या जमनालाल बजाज पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. धर्माधिकारी यांच्या हस्ते यंदाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जयवंत मठकर (सिंधुदुर्ग) यांना रचनात्मक कार्यासाठी, कल्याण पॉल (उत्तराखंड) यांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी, निगहत सफी (जम्मू-काश्मीर) यांना महिला आणि मुलांच्या विकासाकरिता आणि प्रा. ग्लेज पैज (अमेरिका) यांना परदेशात गांधीजींच्या विचारांच्या प्रसारासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रा. ग्लेज यांच्या अनुपस्थितीत हा सन्मान डॉ. सुब्बा राव यांनी स्वीकारला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.    
परिवर्तनाचे काम हे नेहमीच संतांनी आणि समाजाने केले आहे. सेवाकार्यातून आणि अशा निरपेक्ष वृत्तीने समाजकार्य करणाऱ्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन आपल्या निराशेला आशेत रूपांतरित करून आपल्यातील अस्मिता जागृत करा, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले.
भारतातील सर्व नागरिक आणि संस्था, संघटना या भ्रष्टाचारी आहेत, असे चित्र जगापुढे तयार झाले आहे. सर्व राजकीय पक्ष, संस्था, नागरिक हे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, असे सांगत आहेत तर मग भ्रष्टाचार कोण करतोय? असा सवाल करून धर्माधिकारी म्हणाले की, आम्हा सर्वाच्या मुक संमतीनेच हा भ्रष्टाचार सुरू आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. ग्लेज यांच्या मनोगताची ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. पुरस्कार विजेत्यांचा परिचय मधुर बजाज, धीरुभाई मेहता, मरिअम्मा वर्गीस यांनी करून दिला. फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी प्रास्ताविक केले तर मधुर बजाज यांनी उपस्थितांचे आभार मानले.    

Story img Loader